रत्नागिरी : सर्व शासकीय विभागातील विकासाची कामे करणारे कंत्राटदार यांची देयके गेल्या आठ महिन्यांपासून शासनाकडून थकविली गेल्याने राज्य अभियंता संघटनेच्या माध्यमातून मंगळवारी (दि. १९) या कंत्राटदारांनी राज्यात जिल्हास्तरावर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. रत्नागिरीतील संघटनेने पाऊस असल्याने धरणे आंदोलन न करता जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले.
सार्वजनिक बांधकाम विभाग, जलजीवन मिशन, ग्रामीण पाणीपुरवठा, ग्रामविकास विभाग, जलसंपदा, जलसंधारण यासह अनेक विभागातील शासनाची विकासाची कामे करणारे कंत्राटदार यांची देयके गेल्या आठ महिन्यांपासून शासनाकडे थकीत आहेत.
शासनाने अद्याप एकही पैसा या अभियंत्यांना दिलेला नाही. तसेच इतर कामाच्या कालावधीसाठी विनादंड – मुदतवाढ, देयके नसल्याने कंत्राटदार यांची अनामत व अतिरिक्त रक्कम व इतर रक्कम परत मिळणे, निधी नसल्याने कामच बंद आहेत. यासाठी प्रशासकीय अ स्तरावर दमदाटी केली जात असल्याने या ठेकेदारांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे. याबाबत शासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली न गेल्याने अखेर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.
याबाबतचे निवेदन येथील अभियंता संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले. यात असे नमूद करण्यात आले आहे की, गेल्या आठ महिन्यांपासून राज्यातील सगळी विकासकामे ठप्प आहेत. कुठल्याही शासकीय लेखाशीर्षकास कंत्राटदारांची देयके देण्यासाठी निधी उपलब्ध केला जात नाही, नवीन कोणतेही सरकारी विभागाकडील विकासात्मक काम मंजूर केले जात नाही. यामुळे राज्यातील सुबे अभियंता, ओपन कंत्राटदार, मजूर संस्था, वाहतूकदार, माल सप्लायर्स, हातावर पोट असणारे रोजंदारी कामगार आदी घटकांचा रोजगार व चरितार्थ, व्यवसाय अक्षरशः देशोधडीला लागला आहे.
या सर्व उपेक्षितांचे प्रश्न, समस्या, अडचणींबाबत तातडीने मार्ग काढावा. व हे व्यवसाय व त्यावर अवलंबून असणाऱ्या घटकांना न्याय द्यावा. त्यासाठी ठेकेदारांची देयके लवकरात लवकर अदा करावीत, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.
हे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे देताना सागर मांगले, किरण तुळसवडेकर, रवींद्र गुरव, अश्फाक मुकरी, ओमकार गर्दै, सुमेध महाडिक, दळी, दसवंत तसेच इतर जिल्ह्यातील अनेक ठेकेदार उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 20/Aug/2025












