रत्नागिरी : लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या काहीच दिवसावर येवून ठेपले असून गणेशभक्तांकडून आता लगबग सुरू झाली आहे. यंदा सजावटीसाठी कापडी, प्लास्टिकचे पाने, फुले, माळांनी रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ सजली आहे. सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गणेशभक्तांची झुंबड दुकानाबाहेर दिसून येत आहे. साहित्य दरात वाढ झाली आहे.
गणेशोत्सवात पुजेसाठी जुळवाजुळव करावी लागते. यामध्ये आंब्यांची पाने, जास्वंदीची फुले, विड्याची पाने तर असतातच. ताजी फुले मिळणे कठीण असल्यामुळे बाजारात आता कापडी, प्लास्टिकच्या माळा विक्रीस आल्या आहेत. सणासुदीच्या काळात निर्माल्य कुठे टाकायचे हा प्रश्न असतो. या वस्तूमुळे निर्माल्याचा प्रश्न निर्माण होत नाही.
कापडीबरोबरच दुकानामध्ये एकापेक्षा एक आकर्षक, रंगीबेरंगी माळा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये प्लास्टिक, कापडी माळा घेण्याचा कल वाढला आहे. शहरातील माळनाका, मारूती मंदिर परिसरात शोभिवंत माळा, कृत्रीम फुले, तोरणे ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. रंगीबेरंगी फुले आणि पाने अशा वेगवेगळ्या आकारातील माळा बाजारात दाखल झाल्या आहेत.
१०० ते १५० रूपयापर्यंत किमती आहे. तसेच झेंडू, गुलाब, मोगरा फुलांच्या माळा उपलब्ध झाल्या आहेत. गणपतीच्या मागे लावण्यात येणारी पानांची जाळी त्याचबरोबर व सजावटीचे साहित्य विक्रीस उपलब्ध असून, नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे.
चिनी दिव्यांचाच झगमगाट अधिक
गणेशोत्सवात सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या माळा, दिवे, एलईडी आदी रोषणाईसाठी ८० टक्के झगमगाट चिनी दिव्यांचाच आहे. विद्युत रोषणाईसाठी नानाविध उपकरणे, एलईडी दिवे, चिनी बनावटीच्या माळा लेझर रोषणाई, कमळ माळा, दीप असणारे उपकरणे अशा विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य विक्रीस ठेवण्यात आले असून त्याच्या १०० रुपयापासून ते एक हजार रुपयापर्यंत किमती आहेत. समई, पूजा थाळ्या, अगरबत्ती, धूप, रांगोळीचे छाप, रंग आदी साहित्यही विक्रीस ठेवण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:43 PM 22/Aug/2025














