रत्नागिरी:
शहरातील किस्मत कॉलनी परिसरात घराच्या मालकी हक्कावरून झालेल्या वादातून एका महिलेवर लाकडी दांडक्याने हल्ला करून तिला जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना मंगळवार, दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास कर्ला येथील किस्मत कॉलनीतील घर क्रमांक ७०२ मध्ये घडली. समीना सौद मजगावकर (वय ४८ वर्षे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, तमन्ना जमीर मजगावकर (रा. अलीमंझील, किस्मत कॉलनी) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तमन्ना मजगावकर फिर्यादी समीना यांच्या घरी आली आणि “हे घर माझे आहे, तुम्ही घरातून बाहेर जा. हे घर माझ्या नवऱ्याने बांधलेले आहे,” असे म्हणून मोठमोठ्याने आरडाओरड करू लागली. तिने फिर्यादी यांच्या सासू-सासऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी तिच्या हातात एक लाकडी रीप (दांडके) होती.
फिर्यादी समीना यांनी तिला “शिवीगाळ करू नकोस,” असे समजावण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने आरोपी तमन्ना हिने तिच्या हातातील लाकडी दांडक्याने समीना यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूस मारून त्यांना जखमी केले. तसेच, “तुला बघून घेते,” अशी धमकीही दिली.
या हल्ल्यात समीना मजगावकर जखमी झाल्या आहेत. त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी तमन्ना मजगावकर हिच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ३५२/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१) (धमकी देणे), ३५२ (मारहाण), आणि ३५१(२) (दुखापत करणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. कौटुंबिक वादातून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:30 20-08-2025














