राजापुरात गुटखा तस्करीला चाप; नाटे पोलिसांची मोठी कारवाई, गाडीसह १.८८ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाटे, रत्नागिरी (प्रतिनिधी):

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीवर नाटे सागरी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. मिठगवाणे-पारवाडी रोडवर सापळा रचून पोलिसांनी मारुती ओमनी गाडीसह तब्बल १ लाख ८८ हजार २१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ही घटना मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास घडली. नाटे सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय शिवाजी पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एका ओमनी गाडीतून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात होती. त्यानुसार पोलिसांनी मिठगवाणे-पारवाडी रस्त्यावर पाळत ठेवली होती.

यावेळी संशयास्पदरित्या जाणाऱ्या मारुती ओमनी गाडीला (एम.एच.०८-ए.एन-०७६१) पोलिसांनी थांबवून तपासणी केली. गाडीची झडती घेतली असता, त्यात शासनाने बंदी घातलेला केसरयुक्त ‘विमल’ पानमसाला आणि ‘व्ही-१’ तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ गाडीचालक रवींद्र महादेव शिंदे (वय २७ वर्षे, रा. कोतापूर मेढवई, ता. राजापूर) याला ताब्यात घेतले.

जप्त केलेला मुद्देमाल:

एक सफेद रंगाची मारुती ओमनी गाडी: किंमत अंदाजे १,७०,००० रुपये.

‘विमल’ पानमसाला आणि ‘व्ही-१’ तंबाखू: एकूण ९२ मोठी पाकिटे, ज्यामध्ये प्रत्येकी ११ लहान पुड्या होत्या. याची एकूण किंमत १८,२१६ रुपये आहे.

पोलिसांनी एकूण १,८८,२१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी रवींद्र शिंदे याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर ५१/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता (B.N.S.) २०२३ चे कलम १२३, २७४, २७५, २२३ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये खळबळ उडाली असून, नाटे पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:54 20-08-2025