खेडच्या भरणे नाक्यावर भरदिवसा मटका सुरू; पोलिसांच्या कारवाईत एक जेरबंद

खेड, रत्नागिरी (प्रतिनिधी):

खेड शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या भरणे नाका परिसरात भरदिवसा सुरू असलेल्या कल्याण मटका जुगाराच्या अड्ड्यावर खेड पोलिसांनी मंगळवारी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एका व्यक्तीला रंगेहाथ पकडले असून, त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भरणे नाका येथील हॉटेल सन्मानच्या पाठीमागे करण्यात आली. या ठिकाणी काहीजण पैशावर हार-जीतचा खेळ खेळवत असल्याची गुप्त माहिती खेड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण गोविंद कोलगे (वय ५४ वर्षे, रा. प्रशांत कॉम्प्लेक्स, भरणेनाका) हा सार्वजनिक ठिकाणी कल्याण मटका जुगाराच्या शुभअंकावर लोकांकडून पैसे लावून घेत होता. पोलिसांनी छापा टाकताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

या कारवाईत पोलिसांनी एकूण १२५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये १२०० रुपयांची रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरले जाणारे इतर साहित्य यांचा समावेश आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अलीमोद्दीन बदीयोद्दीन शेख यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रवीण कोलगे याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर २६१/२०२५ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे भरणे नाका परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून, खेड पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:23 20-08-2025