रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्याला वीजपुरवठा करणारी निवळी येथील वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यातून पोहत जात पिन इन्सुलेटर व इतर दुरुस्ती केली. संगमेश्वर तालुक्याला वीजपुरवठा करणारी पर्यायी वाहिनी दुरुस्त झाल्यामुळे ग्राहकांना सणासुदीच्या काळात वीजपुरवठा सुरळीत राहिला. ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी जिवाजी बाजी लावून ही कामगिरी केली.
महावितरणच्या संगमेश्वर उपकेंद्राला निवळी व आरवली अशा दोन उपकेंद्रातून ३३ केव्ही उच्चदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. या वीजवाहिनीवरून संगमेश्वर उपकेंद्रासह देवरूख, साडवली व साखरपा अशी इतर तीन उपकेंद्रे आहेत. या उपकेंद्रांवरून सुमारे ६० हजार वीजग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. १७ ऑगस्टला रात्री निवळी व आरवली या दोन्ही लाईनवर बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे चारही उपकेंद्र व उपकेंद्रातील सर्व वीजग्राहक अंधारात गेले. अथक प्रयत्नानंतर १८ ऑगस्टला आरवली उपकेंद्रातून येणारी वाहिनी दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यानंतर निवळी वीजवाहिनीवरील बिघाड शोधण्यात आला. हा बिघाड वांद्री मानसकोंड येथील एका विद्युतखांबावर आढळला.
सोनवी नदीच्या पूरपात्रात हा पोल असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचणे जिकिरीचे व आव्हानात्मक होते; परंतु आरवली वाहिनी सणासुदीला पुन्हा बंद पडली तर पुन्हा तालुका अंधारात जाणार असल्याने व खासगी नौका उपलब्ध होण्यास वेळ लागणार असल्याने महावितरणच्या जनमित्रांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून खोल पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला. नदीचे खोल पात्र, सततचा पाऊस, नदीप्रवाहाचा प्रचंड वेग यामुळे हे काम प्रचंड धोकादायक होते; परंतु जनमित्र आणि अभियंत्यांनी हा धोका पत्करला. रस्सीच्या साहाय्याने खोल पात्रात उतरून पुन्हा पोलवर चढून भरपावसात पिन इन्सुलेटर बदलला व संपूर्ण वाहिनीचा पुन्हा पेट्रोलिंग करून पूर्ण निवळी वाहिनी सुरू केली. यामुळे तालुक्यासाठी असणारी पर्यायी वाहिनी अखंडित वीजपुरवठ्यासाठी पूर्ववत केली.
या कर्मचाऱ्यांचे होतेय कौतुक
महावितरणचे जिगरबाज जनमित्र विलीन काष्टे, प्रतीक तांबे, किरण मोरे, रूपेश फेपडे, सचिन कुंभार यांनी लाईन फोरमन विजय आडविलकर यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण मोहीम पूर्ण केली. याकरिता कनिष्ठ अभियंता योगीनाथ गोरे, सहायक अभियंता फारूक गवंडी व उपकार्यकारी अभियंता अंकुश कौरवार यांचे मार्गदर्शन लाभले. या कामाकरिता वीजग्राहकांकडून तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता सुनीलकुमार माने व कार्यकारी अभियंता जितेंद्र फुलपगारे यांनीही कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 21/Aug/2025













