राजापूर : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी राजापूर शहर सज्ज झाले आहे. राजापूर पालिकेने आमदार किरण सामंत यांच्या माध्यमातून शहरातील मुख्य रस्त्यावरील चौगुले फार्मसी ते शिवस्मारक या दरम्यान पेव्हर ब्लॉक बसवल्याने या भागातील खड्यांची समस्या आता संपुष्टात आली आहे. याशिवाय, रानतळे रस्त्याच्या प्रारंभी पडलेल्या खड्यांच्या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात आल्याने हा रस्ताही आता वाहतुकीसाठी सुयोग्य झाला आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लोकांसह वाह्नांच्या वर्दळीने सातत्याने गजबजलेल्या भागात पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी खड्डे पडलेले होते. याबाबत रिक्षा व्यावसायिक, वाहनचालक व नागरिकांतून सातत्याने तक्रारी होत होल्या, याची दखल घेत आमदार किरण सामंत यांनी नगरपालिका प्रशासनाला गणेशोत्सवापूर्वी त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर, मुख्याधिकारी तुषार बाबर, नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, अभियंता रणवीर देसाई यांनी पावसाळी हंगामातील शहराच्या मध्यवर्ती भागातील समस्या दूर करण्यासाठी पेव्हर ब्लॉक बसविण्याचा पर्याय सूचित केला होता. त्याला आमदार सामंत यांनी सहमती दर्शवत गणेशोत्सवापूर्वी ही समस्या दूर करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे शिवस्मारकापासून चौगुले फार्मसीपर्यंत पेव्हर ब्लॉक बसवले.
रानतळे रस्त्याच्या प्रारंभी पडलेल्या खड्ड्यांच्या ठिकाणी कॉक्रिटीकरण करण्यात आल्याने हा रस्ताही आता वाहतुकीसाठी सुयोग्य झाला आहे. पावसाचा जोर कमी होताच शहरातील मुख्य रस्त्यावरील अन्य भागांतील खड्डे भरण्यात येणार असल्याचे नगरपालिका प्रशासनातर्फे स्पष्ट केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 21/Aug/2025













