दापोली : मांदिवली गावचा सुपुत्र राहुल इंदुलकरला राष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेत रौप्य पदक

दापोली : तालुक्यातील मांदिवली गावचे सुपुत्र राहुल मोहन इंदुलकर यांनी पुन्हा एकदा आपल्या कर्तृत्वाची छाप राष्ट्रीय स्तरावर उमटवली आहे. दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेत (मिस्टर इंडिया) त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदक मिळवले. अथक परिश्रम, जिद्द आणि शिस्त याच्या जोरावर त्यांनी ही कामगिरी साध्य केली असून त्यांच्या या यशामुळे गावाचे तसेच जिल्ह्याचे नाव देशभरात उज्ज्वल झाले आहे.

या स्पर्धेत रौप्य पदक पटकावल्यानंतर राहुल यांची वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताकडून निवड झाली आहे. त्यामुळे आता त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. सध्या राहुल इंदुलकर मुंबई पोलिस दलात ताडदेव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असून, नोकरीसोबतच खेळातील प्रगती साधणे हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले आहे.

यापूर्वीही त्यांनी दिनांक २८ जून २०२५ रोजी केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय आर्म रेसलिंग स्पर्धेत दोन कास्य पदक पटकावून आपले कौशल्य दाखवले होते. अवघ्या काही महिन्यांत राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या सलग यशामुळे त्यांच्या नावाची दखल संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जात आहे.

राहुल यांच्या या यशामुळे केवळ दापोली तालुका व रत्नागिरी जिल्हाच नव्हे तर बृहन्मुंबई पोलिस दलाचाही गौरव झाला आहे. गावातील कुटुंबीय, नागरिक तसेच पोलिस दलातील सहकारी यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, आगामी आंतरराष्ट्रीय वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:41 PM 21/Aug/2025