सूर्यमंदिरासाठी राजापुरात उद्या धर्मसभा

रत्नागिरी : राजापूर चिंचबांध येथील अर्जुना नदीपात्रालगत असलेले सूर्यमंदिर वाचवण्यासाठी राजापूर येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने येत्या शुक्रवारी, दि. २२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या धर्म सभेला प्रमुख वक्ते म्हणून राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नीतेश राणे उपस्थित राहणार असल्याची माहिती राजापूरच्या सकल हिंदू समाजातर्फे देण्यात आली आहे.

सकल हिंदू समाजाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही धर्मसभा जाहीर केली असून राजापूर येथील सूर्यमंदिराचा लढा या धर्मसभेच्या माध्यमातून तीव्र करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या विधानसभा अधिवेशनात राजापूर येथील सूर्यमंदिराच्या लक्षवेधीवेळी राजापुरात सूर्यमंदिरच नसल्याचा उल्लेख झाला होता. त्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. अर्जुना नदीपात्रात चिंचबांध येथील पुरातन वास्तू ही सूर्यमंदिरच असल्याचा निर्वाळा विविध पुराव्यांद्वारे सकल हिंदू समाजाने या प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

हिंदू समाजाला आता लढा उभारण्याशिवाय काहीच मार्ग दिसत नसल्याने या धर्मसभेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे . शहरातील शिवतीर्थ म्हणजेच जवाहर चौकात या धर्मसभेचे आयोजन करण्यात आले असुन ही धर्मसभा शुक्रवारी २२ ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत होणार आहे. धर्मसभेला राजापूर तालुक्यातील सर्व बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 21-08-2025