चिपळूण : पेढेत पुन्हा परशुराम घाटातील भरावाची माती

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटानजिकच्या पेढे पाणकरवाडी येथील नागरी वस्तीत रस्ता रुंदीकरण अंतर्गत घाटात केलेला मातीचा भराव जोरदार पावसाच्या पाण्याने वाहून आल्यामुळे ग्रामस्थांचे नुकसान झाले, तर घरासह परिसरात गुडघाभर चिखल साचून राहिला. या पावसाळी हंगामात घाटातील भरावाची माती पाण्याच्या प्रवाहाबरोबर नागरी वस्तीत व घरात वाहून येण्याचा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. त्यामुळे घाटाची उंची वाढवण्यासाठी केलेला भराव आता परिसरातील नागरी वस्तीला धोकादायक ठरू लागला आहे.

मुंबई-गोवा महामार्ग रूंदीकरण अंतर्गत परशुराम घाटाची उंची मातीचा भराव व संरक्षक भिंत उभारून वाढवण्यात आली आहे; मात्र या कामाचा दर्जा गेली दोन ते तीन वर्षे पावसाळी हंगामात उघड होत आहे. जोरदार पावसामुळे भरावाची माती तसेच संरक्षक भिंती कोसळू लागल्या आहेत तर डोंगराकडील भागातील दरडीची माती कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

कामाच्या सुरुवातीला डोंगराकडील बाजू रूंदीकरणासाठी कापण्यात आली. तसेच भराव करून उंची वाढवण्यात आली. दरम्यान जोरदार पावसामुळे त्यावेळी झालेल्या दुर्घटनेत पेढे गावातील काही नागरिकांना आर्थिक नुकसानीसह जीव गमवावा लागला. त्यानंतर घाटातील भरावाची माती, संरक्षक भिंत, दरडी कोसळण्याच्या घटना असे प्रकार वारंवार घडत आहेत.

गेले चार दिवस चिपळूण शहर परिसरात कोसळणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा घाटातील भरावाची माती नजिकच्या पेढे पाणकरवाडी येथील नागरी वस्तीत पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत वाहून आली. परिणामी, नागरी वस्तीमधील अनेक घरांमध्ये तसेच परिसरातील शेतजमिनी, फळझाडे, फुलझाडे आदी भागात पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ही माती पसरली. यामुळे ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर कामयस्वरूपी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी बाधीत झालेल्यांसहीत भविष्यात धोका निर्माण होणाऱ्या ग्रामस्थांतून होत आहे. तसेच नागरिकांच्या नुकसानीची भरपाईचीही मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 22/Aug/2025