दख्खन नळपाणी योजनेच्या पाईपलाईनवर दगड-मातीचे ढिगारे

देवरुख : आंबा घाटातील दख्खन गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या नळपाणी योजनेच्या पाईप लाईनवर मोठ्या प्रमाणात रवी इन्फ्रा कंपनीच्या ठेकेदारांनी भराव टाकल्याने पाईप लाइन दबली असून दुरुस्ती करणे कठीण झाल्याने गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दख्खन येथे १९ जून रोजी दरड कोसळून त्यात दख्खन गावाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन गाडली गेली. संबंधित ठेकदार कंपनीने नवीन पाईपलाईन करून दिली. या कामास महिन्यापेक्षा जास्त वेळ लागला. आता पुन्हा रोडच्या खालच्या बाजूस उतारावर असलेल्या लाईनवर मोठ मोठे दगड मातीचे ढिगारे टाकल्याने जलवाहिनी दबली गेल्याने नवे संकट उभे ठाकले आहे.
ही लाईन दुरुस्ती करायची झाल्यास भराव हटवून पूर्ण पाईपलाईन मोकळी करावी लागणार आहे.

हे काम ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेरचे आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या पंपांत तांत्रिक बिघाड झाला असेल या शक्यतेने दोन्ही पंप ग्रामस्थानी विहिरीबाहेर काढले त्यांची दुरुस्ती झाली. पुन्हा नव्या पंपाची विहिरीत जोडणी करण्यात आली. जमिनीतील उर्वरित ठिकाणी पाईप लिकेज असतील या शक्यतेने ५०० मीटर नवीन एचडीपीइ पाईप लाईन टाकण्यात आली. तरीही नळपाणी योजना सुरळीत चालत नसून लाईन लिकेज असल्याचे या क्षेत्रातील टेक्निशियन सांगत आहेत. विहिरीपासून टाकीपर्यंत सर्व पाईप लाईन शोधून झाली. किरकोळ असलेले लिकेज काढण्यात आले. हायवे नजीकच्या सुमारे १०० मीटर पाईप लाईनवर मोठ मोठे दगड आणि मातीचे ढिगारे आहेत.

येथील पाईप लाईन लिकेज अथवा दवली गेली असल्याने पाणी पूर्ण क्षमतेने टाकी पर्यंत पोहचत नाही असा तर्क असून ही दगड माती हटवावी लागणार आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदन संबंधित कंपनीला देण्यात आले आहे. दख्खन गावचा पाणी प्रश्न दोन महिने होऊन गेले तरी सुटत नसल्याने पर्यायी नळ योजनेद्वारे अथवा या गाडल्या गेलेल्या पाईप लाईनच्या ठिकाणी नवीन पाईप जोडणी करून पाणी पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी दख्खनवासियाकडून होत आहे.

भरपावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी झरे, विहिरी वर निसरड्या झालेल्या पाय वाटांवरून वृद्ध मंडळींना भटकावे लागत असून घसरून पडण्याचे प्रकार घडत आहेत. पाणी प्रश्न सुटत नसल्याने जनता मेटाकुटीस आली असून हायवे प्रशासन विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 22/Aug/2025