राजापूर : राजापूर कोकण रेल्वेमार्गावरील सोल्ये येथील राजापूर रोड स्टेशन मार्गावरील दोनिवडे येथील मुख्य बसथांब्यावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते; मात्र, शेडअभावी ऊन-पावसाचा सामना करत त्यांना त्या ठिकाणी उभे राहावे लागते. प्रवाशांची ही परवड लक्षात घेऊन दोनिवडे येथील सहयोग प्रतिष्ठाने ग्रामस्थांच्या मदतीने उभारण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या निधीतून सुसज्ज पिकअप शेडची उभारणी केली आहे.
दोनविडे येथील मुख्य बसथांब्यावर उभारण्यात आलेल्या या शेडचे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ग्रामविकास अधिकारी निशांत रायकर यांच्या हस्ते आणि सहयोग प्रतिष्ठानचे पदाधिकारी, ग्रामस्थांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. शेडच्या उभारणीसाठी प्रवीण तोरस्कर, परेश गुरव, अमित पडवळ, संजय पवार, पिंट्या तोरस्कर, अर्जुन शिरवडकर, दिनेश तोरस्कर आदींनी मेहनत घेतली. उद्घाटनाला अनंत गुरव, अमोल करंगुटकर, विष्णू शिरवडकर, उपसरपंच जितेंद्र शिरवडकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष संदीप कुळये, पोलिस पाटील सुचिता करंगुटकर आदी उपस्थित होते. दोनिवडे येथे रस्त्यावर मुख्य थांबा असलेल्या ठिकाणी पिकअप शेड उभारण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षे केली जात होती; मात्र, बांधकाम विभाग वा संबंधित विभागाकडून मागणीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले.
निधीचा आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
याठिकाणी उभे राहणाऱ्या प्रवासी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. याची दखल सहयोग प्रतिष्ठानने घेत प्रवासी शेड उभारण्याचा संकल्प केला. त्यासाठी निधीची उभारणी करण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे दीड लाख रुपये जमा झाले. जमा झालेल्या रक्कमेतून या ठिकाणी सुसज्ज अशी शेड उभारण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 22/Aug/2025














