न्यायमूर्ती खन्ना यांचे जीवन दीपस्तंभासारखे : सरन्यायाधीश भूषण गवई

रत्नागिरी : न्यायमूर्ती खन्ना यांचे जीवन म्हणजे एक तेजस्वी दीपस्तंभ, जो अंधारातही न्यायाचा मार्ग उजळवतो. त्यांच्या विचारांची तार्किकता, स्पष्टता आणि तत्त्वनिष्ठ निर्णय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातील अमिट ठसे आहेत, त्यांचे न्यायालयीन निर्णय न्यायिक विवेकबुद्धीने केलेले नैतिक व ऐतिहासिक विधान होते, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी प्रतिपादन केले.

रत्नागिरीतील अॅड. विलास पाटणे लिखित न्यायमूर्ती एच. आर. खन्ना यांच्यावरील पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात झाले. त्या वेळी सरन्यायाधीश गवई बोलत होते. ते म्हणाले, अॅड. विलास पाटणे यांचे व्यक्तिमत्त्व कायद्याच्या गाभ्याशी जोडलेले आहे, जे न्यायाच्या संवेदनशील व मानवी धाग्यांना समजून घेते. या ग्रंथात न्यायमूर्ती खन्ना यांच्या केवळ चरित्राचाच नव्हे तर त्या काळातील न्यायिक घडामोडींचा धांडोळा ओघवत्या शैलीत घेतात. ते वाचणे उद्बोधक आणि प्रेरक आहे.

या प्रसंगी लेखक आणि रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे म्हणाले, एडीएम जबलपूर खटल्यातून त्यांनी राज्यघटनेच्या पावित्र्याकरिता धैर्य, सामर्थ्य आणि दृढता अधोरेखित केली.

न्यायमूर्ती खन्ना यांनी बाणेदारपणे सर्वोच्च न्यायाधीशपदाचा त्याग केला. आपल्या न्यायालयीन निर्णयाने त्यांनी संविधानाचे जतन केले, असे त्यांनी सांगितले. या वेळी कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विजय पाटील, अॅड. राजशेखर मलुष्टे, अॅड. अमोल सामंत, अॅड. शाल्मली आंबुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 22/Aug/2025