मंडणगड : मंडणगड शहर ते भिंगळोली दरम्यानच्या चार किमी अंतरातील रस्त्यातील खड्डे बुजवण्याची आठ ते दहा दिवसांपूर्वीच केलेली मलमपट्टी दोन दिवसाच्या मुसळधार पावसात सपशेल फेल ठरली.
येथील डागडुजी केलेल्या रस्त्यावरील खड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. त्यातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर खड्डे बुजवण्याच्या मागणीला आता नव्याने जोर मात्र वाढला आहे.
सोळा ऑगस्ट रोजी मंडणगड मधील दिवाणी न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमानिमित्त देशाचे सरन्यायाधीश यांचासह मुख्यमंत्र्यांचा दौरा नियोजित होता, या दौऱ्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्गावर शिरगाव ते मंडणगड शहराच्या हद्दीदरम्यानच्या अंतरात खड्डे बुजवण्यात आले. काही कारणांनी न्यायालयाच्या इमारतीचा लोकार्पण कार्यक्रम पुढे गेला असून तो पुढील तारखांमध्ये घेण्यात येणार आहे, त्यानुषंगाने मान्यवरांचा दौरा रद्द झाला, मात्र डागडुजी करण्यात आलेल्या मार्गावरील खड्डे दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात पुन्हा पूर्ववत झालेत. रस्त्यातील खड्ड्यांची समस्या काही केल्या सुटली नाही. तालुक्यातील राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी काहींनी स्वातंत्र्यदिनी आंदोलनाचा इशारा देखील दिला. 16 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने या आंदोलकांनी आंदोलनाला स्थगिती दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यातील खड्डे बुजवण्याची मागणी आता नव्याने जोर धरू लागली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने उन्हाळी हंगामातच त्यांच्या अखत्यारीत असलेल्या मार्गावरील रस्त्यांची डागडुजी करणे आवश्यक होते, ते न केल्याने त्याचे दुष्परिणाम पावसाळ्यात दिसू लागले आहेत. पावसाळ्यात या मार्गावरील खड्डे बुजवण्यात अडचणी असल्या तरी पावसाच्या उघडीप मध्ये सबंधित खड्डे असलेल्या मार्गांची डागडुजी करणे आवश्यक आहे, गणेशोत्सवात तालुक्यात वाहनांची वर्दळ पाहता खड्डे अपघातास कारण ठरू नयेत याची काळजी घेणे आवशयक ठरते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:11 22-08-2025














