खेड तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट: संगलट येथील BSNL टॉवर फोडून २.२० लाखांचे महागडे उपकरण लंपास

रत्नागिरी, दि. २१: खेड तालुक्यातील दुर्गम भागात चोरट्यांनी आता शासकीय मालमत्तेकडे आपला मोर्चा वळवला असून, तालुक्यातील संगलट येथील भारत संचार निगम लिमिटेडच्या (BSNL) टॉवरच्या बंद खोलीचे कुलूप तोडून तब्बल २ लाख २० हजार रुपये किमतीची महागडी तांत्रिक उपकरणे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना जुलै महिन्याच्या अखेरीस घडली असली तरी, याबाबतची अधिकृत तक्रार २० ऑगस्ट रोजी खेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीएसएनएल कार्यालयातील टेक्निशियन महेंद्र शिर्के आणि वेदांत कंपनीचे काही कर्मचारी दि. ३० जुलै रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास संगलट येथील बीएसएनएल टॉवरवर नवीन साहित्य बसवण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना टॉवरच्या उपकरणांसाठी असलेल्या बंद खोलीचा कडीकोयंडा तुटलेल्या अवस्थेत आढळला. त्यांनी तात्काळ ही माहिती कंपनीचे अधिकारी संदीप नारायण देसाई (वय ३०, रा. मिरज, जि. सांगली) यांना फोनवरून दिली.

घटनेची माहिती मिळताच संदीप देसाई यांनी १९ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, चोरट्यांनी खोलीत ठेवलेले दोन महागडे ‘रिमोट रेडिओ हेड’ (RRH) गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या उपकरणांची एकूण किंमत २ लाख २० हजार रुपये आहे. चोरट्यांनी दि. २९ जुलै ते ३० जुलै या कालावधीत कोणत्यातरी हत्याराच्या साहाय्याने कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि ही चोरी केली.

याप्रकरणी संदीप देसाई यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर २६३/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ऐन पावसाळ्यात दुर्गम भागातील टॉवरला लक्ष केल्याने परिसरात खळबळ उडाली असून, या चोरीमागे तांत्रिक माहिती असणाऱ्या टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खेड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:04 22-08-2025