सावधान! एसटी प्रवासात अनोळख्या व्यक्तीचा ‘पाहुणचार’ पडला महागात; चहातून गुंगी देऊन महिलेचे पावणेदोन लाखांचे दागिने लुटले

राजापूर, दि. २२: एसटी बस प्रवासात अनोळखी व्यक्तीने दिलेला चहा पिणे एका ५० वर्षीय महिलेला चांगलेच महागात पडले आहे. चहातून गुंगीचे औषध देऊन या महिलेचे तब्बल १ लाख ८८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १२ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेनंतर पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर २० ऑगस्ट रोजी राजापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी सौ. बीसाबी अल्लाबक्ष मकानदार (वय ५०, मूळ रा. ऐनापुर, ता. गडहिंग्लज) या १२ ऑगस्ट रोजी दुपारी दीडच्या सुमारास मालवण-रत्नागिरी बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान त्यांच्या शेजारी एक अनोळखी इसम बसला होता. बस तळेरे एस.टी. स्टँडवर आली असता, या इसमाने त्यांना चहा पिण्याचा आग्रह केला आणि स्वतः चहा आणून दिला. त्याच्यावर विश्वास ठेवून सौ. मकानदार यांनी चहा घेतला, मात्र त्यानंतर त्यांना चक्कर येऊ लागली आणि काही वेळातच त्या बेशुद्ध झाल्या.

याच संधीचा फायदा घेत त्या अनोळखी चोराने सौ. मकानदार यांच्या गळ्यातील १ लाख ६० हजार रुपये किमतीचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र आणि हातातील २८ हजार रुपये किमतीची अंगठी, असे एकूण १ लाख ८८ हजार रुपयांचे दागिने काढून घेतले आणि पळ काढला.

शुद्धीवर आल्यानंतर हा प्रकार लक्षात येताच त्यांना रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती सुधारल्यानंतर लांजा पोलिसांनी परटवणे येथील त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवला. गुन्हा घडण्याचे ठिकाण कणकवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने गुन्हा तिकडे वर्ग करण्यात आला, आणि अखेरीस राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. १५४/२०२५) दाखल करण्यात आला आहे.

प्रवासादरम्यान ‘गुंगी टोळी’ पुन्हा सक्रिय झाल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत असून, प्रवाशांनी अनोळखी व्यक्तींकडून कोणतेही खाद्यपदार्थ किंवा पेय घेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. राजापूर पोलीस या अज्ञात चोराचा शोध घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:10 22-08-2025