मंडणगड, दि. २२: तालुक्यात चोरांनी आता थेट शासकीय कार्यालयाच्या आवारातच घुसून चोरी करण्याचे धाडस दाखवले आहे. मंडणगड येथील दापोली फाट्यावर असलेल्या महावितरणच्या ३३/११ के.व्ही. उपकेंद्राच्या शासकीय जमिनीतून, भरदिवसा ४ ते ५ खैराची मौल्यवान झाडे तोडून चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका संशयितासह तिघांविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना बुधवारी, दि. २० ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. महावितरण उपकेंद्रात यंत्र चालक म्हणून कार्यरत असलेले गणेश विठ्ठल चौगुले (वय ४८) हे नेहमीप्रमाणे ड्युटीवर होते. त्यावेळी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या महावितरणच्या मालकीच्या सर्व्हे नंबर २/ल या जमिनीमध्ये आरोपी शिवाजी चंदर जाधव (रा. भिंगळोली आदिवासीवाडी) आणि त्याचे दोन अज्ञात साथीदार यांनी अनधिकृतपणे प्रवेश केला.
यावेळी आरोपींनी आवारात असलेल्या खैराच्या लहान-मोठ्या झाडांपैकी ४ ते ५ झाडे तोडली आणि ती चोरून नेली. हा प्रकार लक्षात येताच गणेश चौगुले यांनी तात्काळ मंडणगड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. चोरून नेलेल्या खैराच्या झाडांची किंमत सुमारे ७,००० रुपये असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
त्यांच्या तक्रारीवरून मंडणगड पोलिसांनी शिवाजी जाधव आणि त्याच्या दोन अज्ञात साथीदारांविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ४२/२०२५ अन्वये भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०३(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा आणि शासकीय कार्यालयाच्या आवारातूनच वृक्षतोड करून चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:10 22-08-2025














