गुहागर : राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रिकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शासनाकडे करण्यात आलेल्या विविध मागण्यांबाबत आश्वासनाची पूर्तता न झाल्याने गुरुवारपासून गुहागरणमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे गुहागर ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पदावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना १४ मार्च २०२४च्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियमित सेवेत समायोजनाबाबत शासन निर्णय झाला असता याबाबतचा सव्वा वर्ष कालावधी होऊनही त्याची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. तसेच मानधन वाढ, रॉयल्टी बोनस ईपीएफ इन्शुरन्स बदली धोरण मान्य होत नसल्याने, त्याचबरोबर
आरोग्यमंत्र्यांनी ८ व १० जुलै रोजी संघटनेच्या शिष्टमंडळास समायोजन प्रक्रिया व विविध मागण्यांबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने हे बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले असल्याचे संघटनेतर्फे दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
या आंदोलनाच्या कालावधीत तालुका अंतर्गत लसीकरण, सत्र विविध अहवाल तसेच ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपाची सर्व कामे बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या आंदोलनामध्ये गुहागरमधून १७ कर्मचाऱ्यांनी सहभागी होत काम बंद आंदोलन यशस्वी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:33 AM 23/Aug/2025














