रत्नागिरी : गेल्या तीन वर्षापासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आर्थिक विकास व्हावा व जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढावे, यासाठी सिंधुरत्न समृध्द योजना राबविण्यात आली. या योजनेत राबविण्यात आलेल्या योजना या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने घेण्यात आल्या. त्यामुळे स्थानिक रोजगारात वाढ झाल्याचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी सांगितले, सिंधुरत्न समृध्द योजनेच्या अभ्यासाकरिता मूल्यमापन यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे यांच्या संशोधन सहयोग व सल्ला सेवा केंद्र यांची जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.
जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी यांनी योजनेशी संबंधित प्रमुख विकास क्षेत्रनिहाय जिल्ह्याचे एकत्रित सादरीकरण केले. यामध्ये शासनाच्या २२ मार्च २०२२ च्या शासन निर्णयानुसार मंजूर अनुदानाला अनुसरुन कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, वने व महिला व बालविकास इ. विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या योजनांची यंत्रणानिहाय सविस्तर माहिती दिली. तसेच सिंधुरत्न समृध्द योजनेत राबविण्यात आलेल्या योजना या जिल्ह्याचा दरडोई उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने घेण्यात आल्या असून, त्यामुळे स्थानिक रोजगारात बाढ झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच मंजूर निधीच्या अनुषंगाने उर्वरित निधी प्राप्त झाल्यास योजनेचे उद्दिष्ट सफल होईल. ही योजना महत्त्वपूर्ण असून, यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांचा आर्थिक विकास होणार असल्याने ही योजना पुढे सुरू ठेवण्यात यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सिंधुरत्न योजनेतून रोजगार वाढीच्या अनुषंगाने, टूरिस्ट बस, हाऊस बोट, मच्छीमार व्यवसायिकांना कुलिंग व्हॅन, बिगर यांत्रिकी नौका बांधणे, ई-स्कूटर, तसेच शेतकऱ्यांना मोफत भात, नागली व भाजीपाला बियाणे बाटप करण्यात आले. आंबा बागायतदारांना बोलेरो गाड्या, फळमाशी सापळे, देण्यात आले आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मालगुंड येथे होणारे प्राणी संग्रहालय हा नाविन्यपूर्ण उपक्रम असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
या बैठकीस वशदाचे संचालक सुमेध गुर्जर, समन्वयक अधिकारी प्रज्ञा दासरवार, संशोधन अधिकारी अजित करपे उपस्थित होते. सिंधुरत्न कार्यकारी समितीचे विशेष निमंत्रित सदस्य अजित यशवंतराव हे दूरदृश्य प्रणालीव्दारे सहभागी झाले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 23/Aug/2025














