चिपळूण : गोवळकोटमधील खड्डे भरण्याचे काम सुरू

चिपळूण : येथील पालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील गोवळकोट व गोवळकोट रोड परिसरात रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्याचे काम हाती घेतले आहे. गोवळकोट रोड येथील ग्रामस्थांनी यावर आवाज उठवला होता. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी रस्त्यावरचे खड्डे सिमेंट काँक्रीटने भरले जात आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गणेशोत्सव काळात पेठमाप, गोवळकोट या भागातील नागरिक चिपळूण शहरातून गणपती आणतात तसेच चाकरमानीसुद्धा याच मार्गाने येतात. यावर्षी गणेशाचा प्रवास खड्ड्यांतून होऊ नये यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते रईस अल्वी, साजिद सरगुरोह आणि इतर कार्यकर्त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाला पाठिंबा मिळवण्यासाठी सोशल मीडियावर सह्यांची मोहीम राबवली त्याची दखल पालिकेला घ्यावी लागली, बांधकाम विभागामार्फत कर्मचाऱ्यांनी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत तेथील खड्डे काँक्रिटने भरण्यास सुरुवात केली आहे. याबद्दल सरगुरोह यांनी प्रशासनाचे आभार मानले.

गोवळकोट रोड येथील रस्त्यावरून गोवळकोट गावाकडे जाता येते. या भागात सर्वच समाजातील लोक राहतात. आता गणेशोत्सव तोंडावर आला आहे. अनेक भक्त चालत तसेच तीन आणि चारआसनी वाहनांमध्ये बाप्पाला घरी आणतात. आम्हाला सर्वांची काळजी आहे म्हणून या भागातील खड्डे पालिकेने बुजवावेत, अशी मागणी पालिकेकडे केली होती- साजिद सरगुरोह, सामाजिक कार्यकर्ते, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 23/Aug/2025