रत्नागिरी : घनकचरा प्रकल्पाचा अहवाल बनवल्याचे २ कोटी ९६ लाख रुपयांचे बील रत्नागिरी नगर परिषदेकडून मिळावे, यासाठी नाशिकच्या निसर्ग कन्सल्टन्सीने जिल्हा न्यायालयात केलेला दावा न्यायालयाने फेटाळला आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या वकिलांनी मागणी बिलांतील तफावत आणि कराराप्रमाणे कामे न झाल्याने बिले अदा करता येत नाहीत. हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. पंचक्रोशीच्या विरोधामुळे दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्प रद्द झाला आहे. याप्रकल्पाला पालकमंत्री उदय सामंत यांनी मिरजोळे एमआयडीसीत जागा उपलब्ध करून दिली आहे.
रत्नागिरी नगर परिषदेचा दांडे आडोम येथे १३ कोटी रुपयांचा घनकचरा प्रकल्प प्रस्तावित होता. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल बनवण्याचे टेंडर नासिकच्या निसर्ग कन्सल्टन्सीला मिळाले. त्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेसोबत करार झाला. त्यामध्ये कामाची बिले झालेल्या कामानुसार टप्प्याटप्याने देण्याची तरतुद होती. त्याचबरोबर प्रकल्प अहवालात सुचवलेल्या बदलानुसार सुधारणा करून देण्याबाबतचीही नोंद असल्याचे रत्नागिरी नगर परिषदेचे वकिल निलांजन नाचणकर यांनी जिल्हा न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
निसर्ग कन्सल्टन्सीकडे प्रकल्प अहवाल बनवून तो रत्नागिरी नगरपरिषदेकडे दिला. तांत्रिक मंजुरीसाठी तो भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवण्यापूर्वी अहवालात काही बदल करण्याचे नगर परिषदेने सूचित केले. त्या सुधारणा करून पुढील इतर परवानग्या घ्यायच्या होत्या. दरम्यानच्या काळात कन्सल्टन्सीने केलेल्या कामांची बिले रत्नागिरी नगर परिषदेकडे सादर केली.
परंतू नगर परिषदेने त्रुटींची पूर्तता न झाल्याने देयके अदा केली नाहीत. पाठपुरावा करूनही नगरपरिषदेकडून दाद मिळत नसल्याने २ कोटी ९६ लाख रुपयांची बिले आदेश व्हावेत, यासाठी न्यायालयात २ वर्षांपूर्वी धाव घेतली होती.
रत्नागिरी न.प.चे वकिल निलांजन नाचणकर यांनी कन्सल्टन्सीकडून न्यायालयाला सादर झालेल्या बिलांमध्ये असलेली तफावतही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. घनकचरा प्रकल्पाच्या ४ टक्के रक्कम घनकचरा प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवाल बनवणाऱ्या निसर्ग कन्सल्टन्सीला देण्याचे टेंडरमध्ये निश्चित होते. परंतू जिल्हा न्यायालयाने निसर्ग कन्सल्टन्सीची मागणीच फेटाळून लावल्याचा निर्णय नुकताच दिला आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या या रत्नागिरी नगर परिषदेला हा निकाल दिलासादायक मानला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 AM 25/Aug/2025














