राजापूर : औद्योगिक विकास महामंडळाच्या नावाने राजापूर तालुक्यातील आंबोळगड येथील क्षेत्रासाठी एक बनावट अधिसूचना तयार करून ती सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट अधिसूचनेमुळे स्थानिक नागरिक आणि संबंधित विभागामध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमआयडीसीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार नाटे पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसीचे अधिकारी पद्माकर सीताराम कनावजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अधिनियम १९६१ च्या कलम ६ अंतर्गत राजापूर तालुक्यातील आंबोळगड येथील क्षेत्रासाठी एक बनावट अधिसूचना तयार केली. ही अधिसूचना २१ जुलै २०२५ पासून लागू झाल्याचे दाखवण्यात आले होते. ही बनावट अधिसूचना वेगवेगळ्या समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आली. या बनावट अधिसूचनेमुळे एमआयडीसीच्या कामकाजाबद्दल संभ्रम निर्माण झाला आणि लोकांमध्ये चुकीची माहिती पसरली. ही बाब गंभीरतेने घेत कनावजे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:02 AM 25/Aug/2025














