साडवली : देवरुख येथील प्रसिद्ध कै. पंताभाऊ जोशी यांच्या चौसोपी वाड्यात काल प्रतिपदेपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. हा गणपती घोड्यावर आरूढ झालेला असतो. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील हा गणपती मानाचा म्हणून ओळखला जोता. शनिवारपासून चौसोपी वाड्यात आरत्यांचे सूर घुमणार आहेत.
भाद्रपद प्रतिपदेला देवरुख येथील कै. पंताभाऊ जोशी यांच्या चौसोपी वाड्यातील मानाच्या गणेशमूर्तीचे वाजत-गाजत आगमन झाले. या गणेशोत्सवात आरत्या आणि अन्य कार्यक्रमात मोठ्या संख्येने भक्त सहभागी होत आहेत. गेली अनेक वर्षे प्रतिपदेच्या उत्सवाची ही परंपरा उत्साहात सुरू आहे. ही उजव्या सोंडेची मूर्ती चांदीची असून, चार इंचाची आहे. चौसोपी वाड्यातील देवघरात ती वर्षभर बघता येते. मूर्ती सापडली तो दिवस होता भाद्रपद शुद्ध प्रतिपदा. त्यामुळे चतुर्थऐवजी प्रतिपदेला या उत्सवमूर्तीचे आगमन होते. परंपरेप्रमाणे हा गणपती अश्वारूढ असतो. लाकडी अश्वावर हाताने ही मातीची मूर्ती तयार केली जाते. सोबत रिद्धिसिद्धी आणि भालदार-चोपदार यांच्या लाकडी मूर्ती असतात. प्रतिपदेला सकाळी लवकर श्रीकांत जोशी (मोरया जोशी, मूळ घर) यांच्या गणपतीचे आगमन होऊन प्राणप्रतिष्ठा होते आणि मग चौसोपीच्या गणपतीची मिरवणूक निघते. त्यामुळे भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला देवरूखला दोन गणपतींची प्रतिष्ठापना होते. अगदी साध्या कोकणी पद्धतीने डोक्यावरून या मूर्ती आणतात. या उत्सवाला ३७५ वर्ष होऊन गेली. आजही हौशीने लोक उत्सवाला येतात. या गणपतीच्या आगमनाने खऱ्या अथनि कोकणात गणेशोत्सवाची सुरुवात होते.
….अशी आहे आख्यायिका
देवरूखला वरच्या आळीत जोशी कुटुंबीयांचा चौसोपी वाडा आहे. त्या घराण्याचे मूळ पुरुष बाबा जोशी हे गणेशभक्त होते. ते मोरगावला मोरेश्वराच्या सेवेत होते. एके दिवशी त्यांना व्याधी निर्माण झाली. काही केल्या निराकरण होईना. तेव्हा मोरेश्वराने स्वप्नात दृष्टांत देऊन मंदिरामागे विहिरीजवळ खणण्यास सांगितले. तेव्हा पेटीत पूजलेली चांदीची गणेशमूर्ती सापडली. जोशीबुवांना आनंद झाला. काही दिवसांत व्याधीही दूर झाली. तेव्हा गणेशाने दृष्टांत दिला की, आपल्या गावी मूर्ती घेऊन जा आणि उत्सव सुरू कर. जोशी कुटुंबीयांनी त्याप्रमाणे केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 25/Aug/2025














