देवरुखात दोन चोरांना शेजाऱ्यांनी पकडले रंगेहाथ !

देवरुख : शहरातील केशव सृष्टी याठिकाणी बंद असलेल्या घरात शिरून लोखंडी कपाट तोडून चोरी – करण्याचा प्रयत्न करत असताना शेजारी असलेल्या – कुटुंबीयांनी दोन चोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना गुरुवारी रात्री घडली.

आरोपी रविराज वसंत बिर्जे (कोसुंब रामवाडी) व मंगेश काशिनाथ पेंढारकर राहणार (देवरुख कांगणेवाडी) यांना फिर्यादी संजय प्रभाकर इंदुलकर राहणार केशव सृष्टी यांनी पकडून देवरुख पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केशव सृष्टी येथील शामराव रामचंद्र सप्रे हे काही कामानिमित्त मुंबई येथे गेले आहेत. यामुळे त्यांचे घर बंद स्थितीत होते. याची माहिती घेऊन दोन्ही आरोपींनी गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास यांच्या बंद घराची कौले काढून घरात प्रवेश केला. घरामधील असलेल्या लोखंडी कपाटाचा दरवाजा घरातील असलेली कटावणी, लोखंडी कुदळ व आरोपींनी आणलेल्या स्क्रू ड्रायव्हरने खोलून आतील वस्तूंची चोरी करत असताना शेजारी असलेल्या इंदुलकर यांना बंद घरातून आवाज आल्यामुळे कानोसा घेतला असता चोरीचा प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले.

संजय इंदुलकर यांनी तत्काळ देवरुख पोलिसांना कळवले व दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हाती दिले. इंदुलकर यांच्या सतर्कतेमुळे चोरीचा अनर्थ टळला. याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हे. कॉ. संदीप जाधव करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:29 PM 25/Aug/2025