बाळ मानेंसोबत बैठक?, राजेंद्र महाडिकांचा इन्कार

संगमेश्वर : रत्नागिरी- संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील उमेदवार अजून निश्चित झालेला नाही. त्यामुळे कोणाशीही गाठीभेटीचा प्रश्न उद्भवत नाही, असे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी केले. माजी आमदार बाळ माने यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताबाबत ते बोलत होते.

विद्यमान मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात महाविकास आघाडी सक्षम उमेदवार देण्याची तयारी करत आहे. रत्नागिरीत मंत्र्यांबाबत नाराजी व्यक्त होत असताना भाजपचे नेते माजी आमदार बाळ माने हे ठाकरे सेनेत जाण्याच्या तयारीत असल्याची आवई उठली होती. माने यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचीही चर्चा सुरू होती. माने यांनी ठाकरे गटामधील काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याचे वृत्त पुढे आले. माने यांच्या निकटवर्तीयांकडून याला दुजोरा मिळत असतानाच राजेंद्र महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना माझी मानेंसोबत बैठक झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढले जात आहेत. महाडिक म्हणाले, रत्नागिरी विधानसभा मतदार संघात परिवर्तनासाठी सक्षम उमेदवार देण्यासाठी कुणाशीही बैठक केलेली नाही. मी गेले काही दिवस संगमेश्वरात होतो. त्यामुळे अशा बैठकांना उपस्थित राहण्याचा प्रश्नच नाही. त्याचबरोबर रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील उमेदवार अजूनही निश्चित झालेला नाही. त्यावर पक्षश्रेष्ठींकडून लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 21-10-2024

Arihant 3