Chiplun : कोकण रेल्वेच्या सतर्क टीमने प्रवाशाचा मोबाईल फोन केला परत

चिपळूण : दि. ०१ फेब्रुवारी २०२५ रोजी कोकण रेल्वेच्या सतर्क टीमने एका प्रवाशाचा ट्रेनमध्ये राहिलेला तब्बल २५,०००/-रुपये किमतीचा मोबाईल फोन सुरक्षितपणे परत केला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०११५३ मधील एका प्रवाशाचा मोबाईल फोन गार्ड साईड जनरल कोचमध्ये राहिला होता. प्रवाशाने तत्काळ याबाबतची माहिती दिली. माहिती मिळताच, ही ट्रेन सावर्ड स्टेशनवर येताच एचसी – सचिन देशमाने आणि सीटी हिरालाल मीना यांनी जनरल कोचची तपासणी केली. तपासणीदरम्यान त्यांना २५,०००/- रुपये किमतीचा VIVO V27 हा मोबाईल फोन सापडला.

यानंतर, स्टेशन मास्तरने या मोबाईलच्या मालकाला म्हणजेच संकेत संतोष कान्हेकर यांना सावर्जा स्टेशनवर बोलावले. संकेत कान्हेकर यांनी आपली ओळख पटवून दिली. त्यांनी सांगितले की ते ठाण्याहून चिपळूणला जात होते आणि घाईत चिपळूण स्टेशनवर उतरताना त्यांचा मोबाईल ट्रेनमध्येच राहिला होता.

सर्व आवश्यक ओळख आणि मोबाईलची पडताळणी केल्यानंतर, संकेत कान्हेकर यांना त्यांचा मोबाईल सुरक्षितपणे परत करण्यात आला. आपला हरवलेला मोबाईल परत मिळाल्यामुळे त्यांनी कोकण रेल्वे आणि आरपीएफ चिपळूण टीमचे विशेष आभार मानले. कोकण रेल्वेच्या या तत्पर आणि प्रामाणिक कामगिरीमुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:08 PM 02-Sep-2025