mandangd : पालघरवाडी मंडळाचा मोबाईलचा अतिवापर कमी करण्याचा संदेश देणारा देखावा आकर्षण

मंडणगड : तालुक्यातील मंडणगड पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सवाच्या माध्यमातून अध्यात्म, मनोरंजन, विविध विषयांसंदर्भात सामाजिक प्रबोधन करत सामाजिक जाणीवेतून जनजागृतीचे महत्त्वपूर्ण कार्य करत असते. सद्यस्थितीतील विविध समस्यांची समाजाला जाण व्हावी यासाठी गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा वसा हाती घेतलेल्या पालघरवाडी गणेशोत्सव मंडळ आता सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. यंदाच्या सजावटीची मूळ संकल्पना विशेष आहे, सद्याच्या युगात मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम पाहता यावेळीच्या देखाव्याच्या माध्यमातून मोबाईलचा अतिवापर कमी करण्याचा संदेश दिला आहे. यंदा गणेश भक्तांसाठी वेगळा पण समस्या बनू पाहत असलेला वस्तूनिष्ठ विषयाचे देखाव्यात सादरीकरण करण्यात आले आहे.

बदलत्या समाज जीवनात लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईलमध्ये गुंतलेले दिसतात. लहान मुलांना तर पारंपरिक असलेल्या खेळांची माहितीही नाही. ज्या खेळांच्या आठवणी कायम आठवणीत राहतात ते खेळ आताच्या नव्या पिढीस अवगत नाहीत. खेळण्याच्या,बागडण्याच्या वयामध्ये मुलांच्या हातात मोबाईल पाहायला मिळतो. मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला असल्याची स्थिती दिसते. घराशी व समाजाशी असलेल्या नात्यांचे भाण मोबाईलमुळे उरले नाही, त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न पालघरवाडी गणेशोत्सव मंडळाने केला आहे. मोबाईलचा अतिरिक्त वापर टाळून कुटुंब व समाजव्यवस्था शाबूत ठेवा असा संदेश मंडळाने प्रवेशद्वाराजवळ दिला आहे. केवळ गरजेपुरता व माहिती मिळवण्यापुरता मोबाईल वापर करणे आवश्यक असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. मुख्य देखाव्यात विटू दांडू, पकडापकडी, लगोरी आदी खेळ खेळण्याचे सादरीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे हा देखावा पाहण्यासाठी भाविक मग्न होतात, आपल्या जुन्या आठवणीत रमतात व जाताना अतिरिक्त मोबाईल बघणार नाही, हा चंगही बांधतात. पालघरवाडीचा देखावा पाहण्यासाठी तालुका, जिल्हास्तरावर भाविकांची गर्दी होत आहे.

पालघरवाडी गणेशोत्सव मंडळ प्रबोधन व धार्मिक विषय घेऊन मानवी देखावे व चलचित्र सादर करते. त्या देखाव्याची गुणवत्ता व सादरीकरण अत्यंत उच्च दर्जाची असते, त्यामुळे दरवर्षी पालघर वाडीचा देखावा हा गणेश भक्तांचा आकर्षणाचा व पर्वणीचा विषय असतो. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांच्या गर्दीचा ओघ सातत्याने वाढत आहे.

मंडणगड शहरापासून अवघ्या सात किलोमीटरवर असलेल्या वाडीतील देखावा पाहण्यासाठी गावागावांतील तसेच नजीकच्या खेड, दापोली, महाड आदी तालुक्यांतून भाविक मोठ्या श्रद्धेने येथे येत असतात. अवघ्या पन्नास घरांच्या वाडीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. कमी मनुष्यबळ आर्थिकस्थिती नसतानाही टाकाऊ वस्तू व नैसर्गिक साधनांपासून देखावे सादर करत सजावटीच्या विविध पद्धतींचा अवलंब मंडळ करत असते. मंडळाने व्यसनमुक्ती, प्रदूषण, एड्स असे प्रबोधनपर विषय हाताळले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 03-Sep-2025