Nana Patole News: राहुल गांधींच्या फोन टॅपिंगच्या दाव्याला काँग्रेस नेते नाना पटोलेंचा दुजोरा; महाराष्ट्रात माझाही फोन टॅप झाल्याचा गंभीर आरोप

Nana Patole News: राहुल गांधींच्या फोन टॅपिंगच्या दाव्याला काँग्रेस नेते नाना पटोलेंचा दुजोरा; महाराष्ट्रात माझाही फोन टॅप झाल्याचा गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची जाहीरपणे माफी मागितली पाहिजे, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा

मुंबई: लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारकडून आपला फोन टॅप केला जात असल्याचा मोठा दावा केला असून, माझ्या सर्व आरोपांचे पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत, असा आरोप केला आहे. राहुल गांधींच्या या दाव्यानंतर आता काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले यांनीही मोठा गौप्यस्फोट केला असून, राहुल गांधींनी केलेले फोन टॅपिंगचे आरोप खोटे नसून ती वस्तुस्थिती असल्याचे म्हटले आहे.

नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, "ते देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी माझाही फोन टॅप केला होता, हे संपूर्ण राज्याला माहीत आहे. रश्मी शुक्ला यांनी माझा फोन टॅप केला होता." तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना केंद्रात पाठवण्यात आले आणि भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणून डीजी पदावर दोन वर्षांची मुदतवाढ देऊन बक्षीस देण्यात आले, असा घणाघातही पटोले यांनी केला. अशा पद्धतीचे अधिकारी पोसून ठेवून विरोधकांचे फोन टॅप करायचे आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करायचे, असे खालच्या दर्जाचे राजकारण भारतीय जनता पार्टी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान मोदींनी माफी मागितली पाहिजे; नाना पटोलेंचा इशारा
मतांची आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर चोरी करणाऱ्या आणि विरोधी पक्षनेत्याचा फोन टॅप करणाऱ्या या कृत्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढे येऊन उत्तर द्यावे आणि देशाची जाहीरपणे माफी मागितली पाहिजे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. तसेच या गोष्टीत सुधारणा झाली नाही, तर तीव्र जनआंदोलन उभारून नरेंद्र मोदींच्या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Arihant 4

पृथ्वीराज चव्हाण यांचेही गंभीर आरोप
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही फोन टॅपिंगच्या आरोपावरून भाजपवर निशाणा साधला आहे. यापूर्वीही इस्रायली पेगॅसस सॉफ्टवेअरचा वापर करून प्रमुख विरोधी नेत्यांचे फोन टॅप केल्याची बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरून समोर आली होती, असे सांगत चव्हाण म्हणाले की, तंत्रज्ञानाचा वापर करून फोन टॅप करणे शक्य आहे, परंतु अशा कृतींना सर्वोच्च पातळीवरून परवानगी असल्याशिवाय ते शक्य होत नाही. गृहमंत्री किंवा पंतप्रधानांच्या परवानगीशिवाय मोठ्या राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे शक्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.