Lanja : निनादेवी मंदिर येथे विदेशी गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त

लांजा : राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई या पथकाने मुंबई गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील पन्हळे तर्फे सौंदळ येथील निनादेवी मंदिर येथे कारवाई करताना विदेशी गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि टाटा कंपनीचा दहाचाकी ट्रक कंटेनर असा एकूण २ कोटी ३६ लाख ७२ हजार २८० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारुसाठ्याची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

कंटेनरमधून गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक केली जात असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, मुंबईने राजापूर तालुक्याच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर पन्हळे तर्फे सौंदळ येथील निनादेवी मंदिर येथे दि. १ सप्टेंबर रोजी पाळत ठेवली होती. यावेळी सदर जागेतून विनापरवाना गोवा राज्य विदेशी मध्याची वाहतूक करणाऱ्या टाटा कंपनीचा कंटेनर ट्रक (क्र. आरजे १४-जीके-९४६४) हा पकडला होता. यामध्ये जप्त करण्यात आलेल्या गोवा बनावटी विदेशी मद्याचे १८६६ बॉक्स आणि टाटा कंपनीचा ट्रक कंटेनर असा एकूण २ कोटी ३६ लाख ७२ हजार २८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी कंटेनर चालक आसिफ आस मोहम्मद याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ए) (इ) ८१, ८३ व ९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई चे आयुक्त राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार सह आयुक्त प्रसाद सुर्वे, उप अधीक्षक रवींद्र उगले, तसेच निरीक्षक रियाज खान, विजयकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. आर. गायकवाड हे करत असून फिर्यादी जवान अमोल चौगुले आहेत.

सदर कारवाईत दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर, जवान चंदन पंडीत, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक रत्नागिरीचे निरिक्षक अमित पडळकर, जवान निलेश तुपे, जवान मलिक धोत्रे यांनी भाग घेतला. कारवाईत मोठ्या प्रमाणात परराज्यातील मद्यसाठा जप्त करण्यात आलेला आहे. यात आंतरराज्य टोळी कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, जनतेस आवाहन करण्यात येत आहे की, अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३३ यासह दूरध्वनी क्रमांक ०२२-२२६६३८८१ या क्रमांकावर संपर्क साधावयाचा आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 AM 03-Sep-2025