Life Certificate at Home for Pensioners: पेन्शनधारकांना आता घरबसल्या मिळणार हयातीचा दाखला; पोस्ट विभागाची विशेष मोहीम सुरू

Life Certificate at Home for Pensioners: पेन्शनधारकांना आता घरबसल्या मिळणार हयातीचा दाखला; पोस्ट विभागाची विशेष मोहीम सुरू

बँकांच्या रांगांमधून ज्येष्ठ नागरिकांची होणार सुटका; ३० नोव्हेंबरपर्यंत पोस्टमनमार्फत किंवा पोस्ट कार्यालयात सेवा उपलब्ध

रत्नागिरी: भारतीय डाक विभाग, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) आणि केंद्र सरकारच्या पेन्शन विभागातर्फे पेन्शनधारकांना आता घरबसल्या डिजिटल हयातीचा दाखला (life certificate at home for pensioners) देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पेन्शनधारकांना हयातीचा दाखला सादर करणे सुलभ व्हावे, यासाठी पोस्ट विभागातील सर्व कार्यालयांत ही विशेष सेवा सुरू करण्यात आली असून, ही मोहीम ३० नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात येत आहे.

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हयातीचा दाखला (जीवन प्रमाणपत्र) सादर करण्यासाठी बँकांमध्ये जावे लागत असे. यामुळे बँकांबाहेर लागणाऱ्या लांबच लांब रांगा, तासनतास करावी लागणारी प्रतीक्षा आणि वाढत्या वयामुळे होणाऱ्या विविध शारीरिक अडचणींचा सामना पेन्शनधारकांना करावा लागत होता.

फेस ऑथेंटिकेशनमुळे प्रक्रिया अधिक सोपी
पोस्ट विभागाच्या या नव्या पुढाकारामुळे आता पेन्शनधारकांना पोस्टमनला घरी बोलावून किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन ऑनलाइन पद्धतीने हयातीचा दाखला देता येणार आहे. या सेवेमुळे ज्येष्ठ नागरिकांचा वेळ, श्रम आणि प्रवासाचा मोठा त्रास वाचणार आहे. विशेष म्हणजे, ‘फेस ऑथेंटिकेशन’ (Face Authentication) तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याने हयातीचा दाखला देण्याची संपूर्ण प्रक्रिया आता अधिक सोपी आणि जलद झाली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पेन्शनधारकांनी ३० नोव्हेंबरपूर्वी या घरपोच सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागातर्फे करण्यात आले आहे.

Yash siddhi