Ratnagiri ST BUS : रत्नागिरीतून दोन दिवसांत १,३३२ बसेस मुंबईस रवाना

रत्नागिरी : गौरी-गणपतीचे विसर्जन केल्यानंतर आता चाकरमानी आपल्या कर्मभूमीत मुंबईला परतू लागले आहेत. बुधवारी तब्बल १ हजार १११ एसटी बसेस मुंबईला गेल्या, तर दोन दिवसात तब्बल १ हजार ३३२ एसटी बसेस रत्नागिरी विभागातून गेल्या आहेत. दरम्यान, आज गुरूवारी ५९२ एसटी बसेस मुंबईला रवाना होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून एसटी, रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दीच गर्दी झाली आहे. कित्येक जण चारचाकी, खासगी स्लिपर कोच, सिटींग बसने मुंबई गाठत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगाच रांगा दिसून येत आहेत.

गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाच्या वतीने ५ हजार २०० एसटी बसेस कोकणात सोडल्या. त्यापैकी २.९५० एसटी बसेस रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्या होत्या. रत्नागिरी शहर, ग्रामीण भागात मोठ्या जल्लोषात लाडक्या बाप्पाचे प्रतिष्ठापना गणेशभक्तांनी केली. दीड दिवसाच्या व मंगळवारी गौरी-गणपतीची मिरवणूक काढून ‘पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करीत भावपूर्वक लाडक्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर आता मुंबईकरांना परतीचे वेध लागले असून एसटी बसेसने आरक्षण केलेल्या बसेस २ सप्टेंबरपासून मुंबईला रवाना होवू लागल्या असून बुधवारी तब्बल १ हजार १११ एसटी बसेस जिल्ह्यातून मुंबईला पोहोचल्या आहेत. दरम्यान उद्या गुरुवार ४ सप्टेंबर रोजी ५९२ मुंबईला रवाना होणार असून त्यापैकी ३७८ बसेस आरक्षित आहेत, तर २१४ ग्रुप बुर्कीगच्या बसेस आहेत.

५ सप्टेंबर रोजी १०४, तर ६ सप्टेंबर रोजी ५७ आणि ७ सप्टेंबर रोजी ५४ अशा एकूण २ हजार १३९ एसटी बसेस मुंबईला रवाना होणार आहेत. दरम्यान, काहीजण खासगी बसेसने मुंबईला जावू लागले आहेत. स्लिपर कोच बसेसवाले भरमसाठ दर घेत असून तरीपण खासगी बसेसकडे ओढा प्रवाशांचा वाढला आहे. तसेच अनेकजण आपल्या चारचाकीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

रत्नागिरी विभागात तब्बल २ हजार १३९ एसटी बसेसचे आरक्षण फूल्ल झाले आहे. २ ते ७ सप्टेंबरपर्यंत टप्प्या टप्प्याने एसटी बसेस मुंबईला रवाना होणार असून यासाठी रत्नागिरी विभाग सज्ज झाला आहे. गुरूवारी ५९२ एसटी बसेस रवाना होणार आहेत-प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 04/Sep/2025