चिपळूण : अनंत चतुर्दशीच्या दिवशी चिपळुणातील सुमारे १६ सार्वजनिक गणेशमूर्तीसह हजारहून अधिक घरगुती गणेशमूर्तीचे शनिवारी रात्री उशिरापर्यंत विविध ठिकाणच्या विसर्जन घाटांवर उत्साहात विसर्जन झाले.
यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या..। या गजरासह ढोल-ताशांचा गजर, डीजेच्या तालावर जल्लोषात विसर्जन करण्यात आले.
दहा दिवस भक्तांच्या घरी मुक्कामास असलेल्या गणरायाने अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप घेतला. शहर परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. सार्वजनिक मंडळांच्या भव्य व देखण्या गणेशमूर्ती, आकर्षक मंडप, विद्युत रोषणाई असे वातावरण होते. घरगुती गणेशोत्सवात देखील घरगुती सजावट, छोट्या व आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सायंकाळी ५ नंतर घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनाची लगबग सुरू झाली. पावसानेदेखील पूर्णतः विश्रांती घेतल्याने विसर्जन मिरवणुकीत उत्साह होता.
ढोल-ताशे आदी विविध वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी, गणपती बाप्पा मोरया…च्या नामघोषात शिस्तबद्ध विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. संपूर्ण बाजारपेठेत विसर्जन मिरवणूक पाहण्यास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्तीचे विसर्जन रात्री उशिराने गांधारेश्वर गांधी घाट या ठिकाणी झाले. घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन बाजार पुलानजीक, पेठमाप, गोवळकोट, बहादूरशेख, रामेश्वर मंदिर, पागमळा विसर्जन घाट आदी ठिकाणी झाले. एकूणच विसर्जन मिरवणुकीत भक्तांचा जल्लोष दिसून आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 08/Sep/2025












