खेड : तालुक्यातील कातळ आळी, वाणीपेठ येथे आज दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन मजली कौलारू घराचे मोठे नुकसान झाले. पहाटे अंदाजे ३:१५ वाजता ही घटना घडली. घरमालक श्री. किशोर चंद्रकांत विचारे यांच्या घरातील किचनमधील फ्रिज अचानक शॉर्टसर्किटमुळे जळाल्याने ही आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे.
आगीची तीव्रता वाढत असताना घरातील तीन भरलेले गॅस सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र किचनमधील साहित्य जळून खाक झाले असून घराचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या मोहिमेत फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, वाहनचालक गजानन जाधव तसेच सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणव घाग आणि सूरज शिगवण यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अपघात टळला.
या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. सुदैवाने वेळेत आग विझवल्याने वस्तीतील इतर घरांना कोणताही धोका पोहोचला नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 12/Sep/2025














