phatak high school : फाटक हायस्कूलमध्ये रंगली विद्यार्थी मुख्यमंत्रिपदाची निवडणूक

रत्नागिरी : फाटक हायस्कूलच्या शालेय स्वराज्य सभा उपक्रमांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६च्या विद्यार्थी मुख्यमंत्रिपदाची निवडणूक उच्च प्राथमिक गटात अर्णव मकरंद पटवर्धन आणि आराध्या संतोष आग्रे, माध्यमिक गटात अभिराम मिलिंद तगारे आणि धनश्री गिरीश तोडणकर, कनिष्ठ महाविद्यालय गटात निखिल हेमंत सावंत आणि गौरी महेंद्र शिंदे यांनी बहुमताने जिंकली.

उच्च प्राथमिक गटात वास्तवातील निवडणुकीचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्याच्यादृष्टीने, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते मतमोजणीपर्यंतची सर्व प्रक्रिया राबवण्यात आली. निवडणूक प्रक्रियेतील सर्वच भूमिका विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पार पडल्या. मुख्यमंत्रिपदाच्या निवडणुकीसाठी नोटांसहित २१ उमेदवार रिंगणात होते. ४ मतदान केंद्र, १६ मतदान अधिकारी आणि ६९५ थेट मतदारांमधून मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेण्यात आले. अर्णव पटवर्धन आणि आराध्या आग्रे यांनी मुख्यमंत्रिपदाची निवडणूक जिंकली. प्रकाश देवरूखकर, संदीप आखाडे, रामदास पाटील, हर्षदा एकावडे, तीर्था कीर यांनी या निवडणुकीचे नियोजन उत्तम पद्धतीने केले.

माध्यमिक गटात १२ उमेदवारांमधून सहा विद्यार्थी प्रतिनिधींची निवड करण्यात आली. मुख्यमंत्रिपदी अभिराम तगारे आणि धनश्री तोडणकर, क्रीडामंत्रिपदी चिराग धुमाळ आणि जान्हवी भोवड, सांस्कृतिकमंत्री म्हणून सार्थक पंडित आणि पूर्वा जोशी यांची वर्गविद्यार्थी प्रतिनिधींमधून निवड करण्यात आली. कनिष्ठ महाविद्यालय गटात निखिल सावंत आणि गौरी शिंदे यांची महाविद्यालय विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. क्रीडा प्रतिनिधीपदी प्रज्वल काजरेकर आणि कशिश सनगरे यांची तर सांस्कृतिक प्रतिनिधीपदी साहिल देवरूखकर आणि वैष्णवी इंगळे यांची वर्गप्रतिनिधींमधून बहुमताने निवड करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 13/Sep/2025