रत्नागिरी : रत्नागिरी शहरात रस्त्यांवर आणि फुटपाथवर वाढत जाणाऱ्या फळ विक्रेते आणि फेरीवाल्यांवर परिणामकारक कारवाई करण्यासाठी नवी पद्धत अवलंबण्यात येत आहे. फळांच्या गाड्या किंवा टपऱ्या उचलून आणणे अडचणीचे असल्याने त्यांचे वजन काटेच जप्त केले जात आहेत. रत्नागिरी नगर परिषदेकडून या कारवाईचा वेग आता वाढवण्यात येणार आहे.
सणासुदीचे दिवस आले की, रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर फळ विक्रेते, टपऱ्या व इतर वस्तू विक्रीच्या हातगाड्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे रत्नागिरी नगरपरिषदेकडे प्रत्येकवेळी तक्रारी येत असतात. कारवाई करणाऱ्या मालमत्ता विभागाकडे कामगार वर्ग कमी आहे. त्याचबरोबर टपऱ्या, हातगाड्या उचलून आणण्यासाठी एक छोट्या हौद्याची पिकअप व्हॅन आहे. या वाहनात एखाद दुसरी हातगाडी सामावू शकते. त्यामुळे या मालमत्ता विभागाच्या कारवाईवर मर्यादा येत होत्या. यावर आता नवीन उपाय शोधण्यात आला आहे.
रस्ते आणि फुटपाथ अडवून बसणाऱ्या या विक्रेत्यांचे वजन काटेच जप्त केले जात आहेत. जप्त केलेले हे वजनकाटे दंडात्मक कारवाई करून परत दिले जातात. दरम्यान, ज्या कोणाची फळे, भाजी व इतर खाद्यपदार्थ जप्त केले जातात ते रिमांड होमला दिले जात आहेत. नगर परिषदेच्या या कारवाईमुळे टपरीचालकांनी धसका घेतला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 15/Sep/2025














