रत्नागिरी : अनिकेत लोहिया, शिवाजी माने यांना नवनिर्माण गौरव पुरस्कार

रत्नागिरी : दुष्काळी भागात जलसंवर्धनाचे भरीव कार्य करणारे ‘मानवलोक’ संस्थेचे अनिकेत लोहिया (अंबेजोगाई) आणि वैज्ञानिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करणारे युवा कार्यकर्ते शिवाजी माने (जढाळा, लातूर) यांना पहिला नवनिर्माण पुरस्कार जाहीर झाला आहे.

येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून यानिमित्ताने येत्या २५ आणि २६ ऑक्टोबरला विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त पहिल्या नवनिर्माण पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी केली. अनिकेत लोहिया आणि शिवाजी माने यांना प्रत्येकी रोख २५ हजार रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असा पुरस्कार दिला जाणार आहे.

येत्या २६ ऑक्टोबरला सायंकाळी साडेचार वाजता हा सोहळा एमआयडीसीतील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी विद्यानिकेतनमध्ये होईल. या वेळी फिजिओथेरपी महाविद्यालयाचे उद्घाटन (कै.) मोहन खातू क्रीडा संकुल अनावरण या कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. पद्मश्री डॉ. गणेश देवी, पद्मश्री डॉ. झहीर काझी, माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य, डॉ. प्रदीप ढवळ यांच्या उपस्थितीत हा सोहळा होईल.

हेगशेट्ये यांनी सांगितले की, वंचित बहुजन वर्गातील विद्यार्थ्यांना, युवकांसाठी प्रेरणादायी आणि प्रज्वलित करणारे अंकूर मनात जागवू शकतील, अशा विविध क्षेत्रातील प्रतिभावंतांना गौरवण्यात येते. महाराष्ट्रात विविध क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांच्या कार्याची ओळख रत्नागिरीकरांना होण्याकरिता संस्थेने विज्ञान, शिक्षण, सामाजिक, साहित्य या चार क्षेत्रांपैकी दरवर्षी दोन क्षेत्रांतील विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना नवनिर्माण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचे ठरविले आहे.

Vinayka motars

अनिकेत लोहिया हे प्रयोगशील व्यक्तिमत्त्व आहे. ते शेतकरी, कष्टकरी असून ऊस कामगारांचे प्रश्न मांडताना शेती आणि पाण्याच्या जागृतीकडे अधिक लक्ष देतात. दुष्काळी भागात समाजोपयोगी प्रकल्प राबवून पाणीटंचाईवर त्यांनी मात केली. त्यांची शेती आणि मातीशी नाळ जोडलेली आहे. अनेक अडचणी, गरिबीवर मात करत शिवाजी माने यांनी कामावरची निष्ठा, प्रामाणिकपणा उराशी बाळगून वाटचाल सुरू ठेवली. विज्ञानाच्या ध्यासातून नवनवीन प्रयोग करत मुलांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण केली. टाकावू वस्तूपासून वैज्ञानिक साहित्य बनवले आहे. या दोघांच्या कार्यासाठी त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 22-10-2024