Nobel Prize 2025: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर

Nobel Prize 2025: या वर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कारजपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील तीन नामवंत वैज्ञानिकांना जाहीर झाला आहे. रॉयल स्वीडिश अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसने सुसुमू कितागावा ( जपान), रिचर्ड रॉबसन (ऑस्ट्रेलिया) आणि उमर एम. याघी ( अमेरिका) यांना “मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स (MOFs)” च्या विकासासाठी 2025 चा नोबेल पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे संशोधनाचा विषय?

या तिघांनी धातू आणि सेंद्रिय अणूंनी बनलेल्या एका नवीन प्रकारच्या आण्विक रचनेचा (molecular structure) शोध लावला, ज्याला “मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क” म्हणतात. ही संरचना अतिशय सूक्ष्म पण व्यवस्थित जाळ्यासारखी असून, तिच्यात असंख्य सूक्ष्म पोकळ्या (pores) असतात. या पोकळ्यांमुळे गॅस आणि द्रव्ये शोषली, साठवली किंवा फिल्टर केली जाऊ शकतात. त्यामुळे ऊर्जा साठवण, कार्बन कॅप्चर, आणि औषधनिर्मिती यांसारख्या क्षेत्रांमध्ये या तंत्रज्ञानाचा प्रचंड उपयोग होऊ शकतो.

अ‍ॅकॅडमीने म्हटले की, “सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर एम. याघी यांनी आण्विक पातळीवर एक पूर्णपणे नवे वास्तुशास्त्र निर्माण केले आहे, जे पदार्थांच्या जगात क्रांती घडवू शकतं.”
1989 मध्ये रिचर्ड रॉबसन यांनी पहिल्यांदा कॉपर आयन्स (Copper ions) आणि टेट्राहेड्रल ऑर्गेनिक मोलेक्यूल्स एकत्र करुन एक नवीन प्रकारचा विशाल क्रिस्टल तयार केला होता. ही रचना हिऱ्यासारखी होती, पण तिच्या आत असंख्य सूक्ष्म छिद्र होते.

सुसुमू कितागावा यांचे योगदान

जपानचे सुसुमू कितागावा यांनी हे दाखवून दिले की, या संरचनांमधून गॅस सहजपणे आत-बाहेर प्रवाहित होऊ शकतो. त्यांनी हेही सुचवल की, हे मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्क्स लवचिक (flexible) बनवता येऊ शकतात, म्हणजेच त्यांचा उपयोग विविध औद्योगिक आणि पर्यावरणीय गरजांसाठी होऊ शकतो.

उमर याघी यांचे काम

अमेरिकेचे उमर एम. याघी यांनी या संकल्पनेला अधिक स्थैर्य दिले. त्यांनी अत्यंत मजबूत आणि स्थिर MOF तयार केला आणि दाखवले की, त्याचे रासायनिक डिझाइन आपल्या गरजेनुसार बदलता येऊ शकते. त्यामुळे MOF ला नवीन आणि उपयुक्त गुणधर्म (properties) मिळू शकतात, जसे की गॅस साठवण, हायड्रोजन ऊर्जा निर्मिती, आणि प्रदूषण नियंत्रण.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:10 09-10-2025