इस्लामाबाद/पेशावर : पाकिस्तानच्या सैन्याने अफगाणिस्तानात घुसून २१ चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा रविवारी केला, तर अफगाणिस्तानने शनिवारी पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार मारल्याचे म्हटले. पाकिस्तानने मात्र आपले २३ सैनिक ठार झाल्याचे सांगितले आहे.
गेल्या आठवड्यात पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा ओराकाझी जिल्ह्यात अफगाणिस्तानातून तहरिक-इ-तालिबान पाकिस्तान या अतिरेकी संघटनेने पाकच्या सैन्यावर हल्ला करून ११ जवान ठार मारले होते. त्यात एक लेफ्ट. कर्नल व मेजर दर्जाचा अधिकारी ठार झाला.
ड्युरंड सीमेवर २०० तालिबानी सैनिक ठार –
काबूलमधील बॉम्बस्फोट पाकिस्तानने घडवल्याचा आरोप अफगाणिस्तानने केला होता, तर आमच्या नागरिकांवर अफगाणिस्तान अकारण हल्ले करत असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. या हल्ल्यानंतर ड्युरंड सीमेवर संघर्ष उफाळला. यात तालिबानचे २०० सैनिक ठार झाल्याचे समजते.
‘पाकचे आक्रमण खपवून घेणार नाही’ –
नवी दिल्ली : पाकिस्तानविरोधात सुरू असलेल्या संघर्षात अफगाणिस्तान शांततेच्या मार्गाने तोडगा काढू इच्छिते. पण, शांतता प्रस्थापित होत नसेल तर अन्य मार्ग आहेत आणि अफगाणिस्तान कोणत्याही आक्रमणाला कठोर प्रत्युत्तर देईल असा इशारा अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमिर खान मुत्ताकी यांनी रविवारी दिला.
मुत्ताकी यांनी सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला. आमच्या सार्वभौमत्वावर कोणी हल्ला करत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही. आम्हाला कोणताही तणाव नको आहे. जर ही भूमिका त्यांना मान्य नसेल तर आमच्याकडेही अन्य पर्याय असल्याचे मुत्ताकी यांनी पाकिस्तानला
इशारा देत म्हटले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:28 13-10-2025














