India-Russia Deal: एकीकडे डोनाल्ड ट्रम्परशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतावर कर लादत आहेत, तर दुसरीकडे भारताने रशियासोबत विमाननिर्मिती क्षेत्रात ऐतिहासिक करार केला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि रशियन कंपनी युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (UAC) ने मॉस्को येथे सुखोई सुपरजेट SJ-100 या, नागरी विमानाच्या निर्मितीसाठी सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली.
‘मेक इन इंडिया’ला मिळणार बळ
हा करार ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमांसाठी एक मोठा टप्पा ठरणार आहे. HAL ला आता भारतात SJ-100 विमान निर्मितीचा विशेष अधिकार मिळाला असून, यामुळे देशात नागरी विमानन क्षेत्रात मोठी झेप अपेक्षित आहे.
सुखोई सुपरजेट SJ-100 ची वैशिष्ट्ये
SJ-100 हे ट्विन-इंजिन, नॅरो-बॉडी प्रवासी विमान आहे, ज्यात सुमारे 100 प्रवाशांची क्षमता असून, सुमारे 3,000 किमीपर्यंत उड्डाण करू शकते. हे विमान विशेषतः देशांतर्गत आणि प्रादेशिक हवाई प्रवासासाठी डिझाइन करण्यात आले आहे. सध्या जगभरात 200 हून अधिक सुपरजेट्स कार्यरत असून, 16 पेक्षा अधिक एअरलाइन्स त्यांचा वापर करत आहेत.
प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसाठी ‘गेम चेंजर’
विमानन तज्ज्ञांच्या मते, भारतात SJ-100 चे उत्पादन हे सरकारच्या ‘उडान’ (Ude Desh Ka Aam Nagrik) योजनेसाठी गेम चेंजर ठरू शकते. देशातील लहान शहरांना आणि पर्यटन केंद्रांना हवाई सेवेशी जोडण्यासाठी हे विमान अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
आगामी दशकात भारताला या श्रेणीतील 200 पेक्षा जास्त जेट्सची गरज भासेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच हिंद महासागर परिसरातील आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांसाठीही 350 अतिरिक्त विमानांची आवश्यकता असेल.
रोजगार आणि तंत्रज्ञान क्षेत्राला चालना
या प्रकल्पामुळे देशात मोठ्या प्रमाणावर थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. विमान निर्मितीशी संबंधित स्पेअर पार्ट्स, देखभाल, लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळीमध्ये हजारो संधी निर्माण होतील. HAL साठी हा एक तांत्रिक टप्पा ठरेल, जो भारताला नागरी विमाननिर्मिती क्षेत्रात जागतिक स्तरावर स्थान मिळवून देईल.
भारत-रशिया नात्यांत नवा अध्याय
संरक्षण क्षेत्रात आधीच मजबूत भागीदारी असलेल्या भारत आणि रशियामधील हा करार आता नागरी विमानन क्षेत्रालाही नवी दिशा देईल. HAL आणि UAC यांच्यातील हे सहकार्य भारतात पूर्णपणे प्रवासी विमान निर्मितीचा पहिला प्रयत्न ठरणार आहे.
याआधी HAL ने 1961 साली AVRO HS-748 चे उत्पादन केले होते, जे 1988 मध्ये थांबवण्यात आले. आता SJ-100 निर्मितीमुळे भारतीय विमाननिर्मिती उद्योगाच्या इतिहासात नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:18 28-10-2025














