Ganpatipule : गणपतीपुळेतील खराब रस्ते, वाहतूक कोंडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गणपतीपुळे : तालुक्यातील गणपतीपुळे येथील खराब रस्ते आणि जीवघेणी वाहतूक कोंडी याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी भगवतीनगर सामाजिक कार्यकर्ते वैभव घाग यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, जयगडपासून गणपतीपुळ्यापर्यंत ८ गावांना रत्नागिरीकडे जाण्यासाठी गणपतीपुळे येथूनच पुढे जावे लागते. याच मार्गावर आपटा तिठा येथे येणाऱ्या भाविकांकडून अभ्यागत कर वसूल केला जातो आणि यासाठी थांबलेल्या वाहनांची सुट्टीच्या दिवसात इतकी गर्दी होते की तासनतास येथे वाहने अडकून पडतात. फुटलेली गटारे, अरुंद आणि खोदलेले रस्ते आणि त्याच रस्त्यावरून वाहणारी गटारे या सर्वामुळे पर्यटकांबरोबर येथून पुढे जाणाऱ्या सर्वांनाच हा त्रास सहन करावा लागतो.

वाहतूक कोंडीमध्ये एखादी रुग्णवाहिका अडकली तर एखाद्याचा उपचाराविना जीव जाऊ शकतो. आसपासच्या पर्यटक निवास म्हणजे होमस्टेच्या परवानग्या या सहज आणि सुलभ हव्यात असे मत व्यक्त होत आहे. कोणत्याही प्रकारच्या परवानग्या अडकू नयेत. जितक्या रूम तितक्या वाहनांची पार्किंग पाहूनच एमटीडीसीने होम स्टेला परवानगी द्यावी, अशा अनेक मुद्द्यांबाबत त्यांनी लक्ष वेधले असून यावर जलद गतीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी या निवेदनात घाग यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 PM 03/Nov/2025