Electric Bus : रत्नागिरी आगारात ई-बसेसची प्रतीक्षाच…

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात १५० हून अधिक ई-बसेस येणार आहेत. त्यासाठी चार ठिकाणी चार्जिंग स्टेशनचे काम सुरू होती. त्यापैकी दापोली येथील चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले असून, ई-बससेवा सुरू झाली आहे. मात्र रत्नागिरीसह खेड, चिपळूण येथील चार्जिंग स्टेशनचे काम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे रत्नागिरी आगारात आणखी काही काळ ई बसेसची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वाढत्या इंधन दरवाढीमुळे आता एसटी महामंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक ई-बसेस, सीएनजी बसेस सुरू करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्वावर चिपळुणमध्ये सीएनजी बसेसची सुरूवात झाली आहे. तर दापोली येथे चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यामुळे ई-बससेवा सुरू झाली असून, तब्बल ३० हून अधिक बसेस दापोली आगारात आल्या आहेत. दुसरीकडे रत्नागिरी, खेड, चिपळूण येथील चार्जिंग स्टेशनचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे ई-बसेस रत्नागिरीत आल्या नाहीत. वीज कनेक्शन देण्यासाठी साहित्य आले असून, चार्जिंग स्टेशनचे काम प्रगथीपथावर आहे. गणेशोत्सव, दिवाळीचा मुहूर्त हुकला असून, आता डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होण्याची आहे. नव्या वर्षात रत्नागिरीसह चिपळूण, खेड या आगारात ई-बससेवा सुरू होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रत्नागिरीकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

याठिकाणी ई-बससेवा सुरू होणार
दापोलीत चार्जिंग स्टेशनचे काम झाल्यामुळे ई-बसेस आल्या असून, बससेवा सुरू झाली आहे. रत्नागिरी, खेड, चिपळुणात चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी ई-बससेवा सुरू होईल.

दापोली आगारात ई-बसेसवा सुरू झालेली आहे. लवकरच रत्नागिरीसह उर्वरित ठिकाणी ई-बससेवा सुरू होईल. चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. – प्रज्ञेश बोरसे,विभाग नियंत्रक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:37 PM 03/Nov/2025