रत्नागिरी : पाचवीतील हिंदी विषय बंद होणार नाही

कडवई : नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता पाचवीचा हिंदी विषय बंद करण्यात येणार होता तसेच इयता पाचवी ते बारावीपर्यंच्या हिंदी विषयाला वैकल्पिक ठेवण्यात येणार होते. या विषयाला फ्रेंच व जर्मन भाषेचा पर्याय दिला जाणार होता. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी यांनी मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत पाचवीतील हिंदी विषय बंद करू नये याविषयी आवाज उठवला होता.

अनिलकुमार जोशी यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुनील तटकरे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना निवेदन पाठवून हिंदी बंद करण्याच्या निर्णयाला विरोध केला. त्यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले व चर्चा केली. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक, संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक सशोधन व प्रशिक्षण संस्था, विद्या प्राधिकरण, संचालकबालभारती हिंदी भाषा विशेषाधिकारी अलका पोतदार, संचालक माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभाग यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले व चर्चा केली. हिंदी विषयावर अन्याय झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा जोशी यांनी सरकारला दिला होता.

महाराष्ट्र राज्यात हिंदी विषय पाचवी ते बारावीपर्यंत कायम रहावा व त्रिभाषा सूत्र कायम रहावे यासाठी अनिलकुमार जोशी यांनी महाराष्ट्रातील शेकडो ग्रामपंचायतींना भेट देऊन ग्रामपंचायतीचे ठराव प्राप्त केले होते. त्यानुसार अभ्यासक्रम आराखड्यात हिंदी विषयाला इयत्ता पहिलीपासून बारावीपर्यंत मंजुरी दिल्याचा आदेश नुकताच प्रसिद्ध झाला. हे यश हिंदी महामंडळाच्या संघटन शक्तीचे असल्याचे प्रतिपादन जोशी यांनी केले आहे. त्यांच्या लढ्याला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा मिळत होता. यापुढे इयत्ता पाचवीपासून बारावीपर्यंत ५० गुणांचा हिंदी विषय ठेवणे चुकीचे असून, १०० गुणांचाच हिंदी विषय ठेवावा, अशी मागणी जोशी यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:05 PM 24/Oct/2024