Breaking : चंपक मैदानावर ‘त्या’ तरूणीवर अत्याचार झालाच नाही?; पोलिसांकडून न्यायालयात अहवाल सादर

रत्नागिरी : दोन महिन्यांपूर्वी चंपक मैदानात एका तरूणीवर अत्याचार झाल्याच्या प्रकरणाला वैद्यकीय अहवाल आणि तांत्रिक पुराव्यांमुळे कलाटणी मिळाली आहे. पीडितेवर अत्याचार झाला नसल्याचे या अहवालामुळे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील पीडित युवतीला आरोग्यविषयक समस्या आहेत. तिने आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा गैरसमज करुन घेत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, असा अहवाल पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आला आहे.

चंपक मैदानात आपल्यावर अत्याचार झाल्याची एका युवतीने २६ ऑगस्ट रोजी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. गुन्ह्याचे गांभीर्य व संवेदनशिलता लक्षात घेऊन रत्नागिरीचे पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी ४ पोलीस अधिकारी व ७ पोलीस अंमलदारांचे एक विशेष तपास पथक नेमून तपास करण्याचे आदेश दिले होते. पिडीत युवतीची जिल्हा शासकिय रुग्णालयात या गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्ण वैद्यकिय तपासणी करुन नमुने घेण्यात आले. त्यानंतर ते न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, कोल्हापूर यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या गुन्ह्याच्या तपासात युवतीला विश्वासात घेउन तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर एकूण २६ साक्षिदारांची चौकशी करुन जबाब नोंदवण्यात आले. तसेच रत्नागिरी शहरातील विविध ठिकाणचे सी.सी.टी.व्ही फुटेज तपासून त्याआधारे हा तपास करण्यात आला. या तपासात युवतीवर कोणताही अत्याचार झाला नसल्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आलेला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:21 24-10-2024