Ratnagiri : पावसाच्या विश्रांतीने भात कापणी, नाचणी वेचण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

पावस : पावस पंचक्रोशीत गेले दोन दिवस पावसाने पूर्ण विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुसळधार पावसामुळे पंचक्रोशीतील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पंचनामे सुरू आहेत. सुमारे २५ ते ३० टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे; मात्र दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने जमीनदोस्त झालेली शेतीची कापणी करण्यास सुरुवात केली असून, नाचणी पीक वेचण्यास सुरुवात झाली आहे.

अरबी समुद्रातील वादळीस्थितीमुळे पंधरा दिवस पावस पंचक्रोशीत पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे तयार भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यातही सकाळच्या टप्प्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भातकापणी सुरू केली होती; परंतु कापलेले भात सुकवण्यातही अडचणी आल्याने नुकसान झालेच. अनेक ठिकाणी पावसाने तयार भातशेती आडवी झाल्याने त्याला पुन्हा कॉब आले. त्यामुळे महसूल विभागाने पंचनामे करायला सुरुवात केली. दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकरी उर्वरित भिजून गेलेली भातशेती वाळवून उर्वरित पीक घरी नेण्यासाठी धडपड करत आहेत. भातशेतीसह अनेक ठिकाणी नाचणीचे पीकही आडवे झाले होते. हे पीकही वेचण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

यावर्षी सुरुवातीपासून भातशेती व नाचणी पिकाला पोषक वातावरण होते, परंतु शेवटच्या टप्प्यातील पाऊस भातशेतीला त्रासदायक ठरला. पावसाच्या लपंडावामध्ये काही प्रमाणात भातशेतीची कापणी करण्यात आली होती. आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तयार झालेले नाचणी पीक काढण्यास सुरुवात केली आहे. हे करत असताना अजूनही पावसाची शक्यता धरूनच हे कामही तातडीने केले जात आहे- अर्जुन भुते, शेतकरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 06/Nov/2025

Tata motars punch