चिपळूणमध्ये ५ हजार १७ नवमतदारांची नोंद

चिपळूण : महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षांत मोठ्या प्रमाणात उलथापालथ होत आहे. अस्थिर राजकारणामुळे लोकशाही प्रक्रियेतून तरुणवर्ग बाजूला जात असल्याचे दिसत होते; परंतु चिपळूण विधानसभा मतदारसंघात या संदर्भात आशेचा किरण दिसत आहे. १८-१९ वयोगटांतील ५०१७ नवमतदारांनी विधानसभा निवडणुकीसाठी नोंदणी केली आहे.

मतदार नोंदणीची निरंतर चालणारी प्रक्रिया विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी (ता. १९) थांबविण्यात आली. वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मताधिकार प्राप्त आहे; परंतु राजकारणात सतत होणारे पक्षांतर, सत्तांतरामुळे तरुणवर्ग निवडणुकीत भाग घेण्याबाबत उदासीन दिसतो.

निवडणूक विभागाकडून या नवमतदारांची नोंदणी करून घेण्यासाठी अनेक उपक्रम राबवूनही त्यास प्रतिसाद मिळत नव्हता. अठरा वर्षे झाली तरी मतदार यादीत नाव नसणाऱ्यांची संख्या खूपच मोठी आहे. १८ ते १९ या वयोगटाची लोकसंख्येतील मतदारांची टक्केवारी साडेतीन टक्के आहे आणि मतदार नोंदणीतील टक्केवारी फक्त सव्वा टक्क्यांच्या आसपास आहे. २० ते २९ या वयोगटाची लोकसंख्येतील टक्केवारी १८ टक्के आहे; पण मतदार यादीतील टक्केवारी केवळ साडेतेरा टक्के आहे. ही तफावत सातत्याने वाढत चालली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक प्रयत्न करूनही या विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढलेली नव्हती; मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी नवमतदारांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे मतदार यादीवरून दिसून येत आहे.

स्थलांतरांची संख्या मोठी

चिपळूण व संगमेश्वर या तालुक्यांतील बहुसंख्य तरुणवर्ग नोकरी-व्यवसायाच्या शोधात बाहेर पडतो त्यामुळे त्यांची मतदार नोंदणी राहून जाते. आजही या तालुक्यांमधील स्थलांतरितांची संख्या मोठी आहे. याचा परिणाम येथील मतदानाच्या एकूण टक्केवारीवरून दिसून येतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:17 PM 24/Oct/2024