Rabbi Hangam : जिल्ह्यात वातावरण पोषक तरी रब्बीच्या पेरण्या संथ…

रत्नागिरी : नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा सरला तरी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्यांनी अद्याप म्हणावा तसा वेग पकडलेला नाही. जिल्ह्यात एकूण सरासरी सहा हजार हेक्टर क्षेत्राबर रब्बी हंगामच्या पेरण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत रब्बीचा एकूण पेरा ४.७६ टक्क्यांवर पोहोचला आहे. केवळ २४३ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. ऊसपिकासह २५९.३५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कुळीथ, संकरित, पावटा, मका, कडधान्य यासह विविध पिकांची पेरणी झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात सलग सहा महिने पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे बाया गेला आहे. भात शेती हातातून गेली. यंदा भात पिकाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पाऊस झाल्याने यंदा रब्बी हंगाम लांबला आहे. खरीपाचे कामे अद्याप पूर्ण झाली नाही. ज्यांचे झाले आहे अशा शेतकऱ्यांनी शेतातील नांगरणी केलेली असून कडधान्यासह पालेभाज्यांची पेरणी पूर्ण झालेली आहे. तब्बल २४३ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. सर्वाधिक पेरण्या राजापूर, संगमेश्वरात झाल्या आहेत. तर सर्वात कमी मंडणगडात झाले आहे. अद्याप शेतातील कामे रखडल्यामुळे रब्बीच्या पेरण्या मंदावल्या असून थंडीचे वातावरण असून पेरणीला चांगले, पोषक वातावरण असल्यामुळे पेरण्याला वेग येईल, महिनाभरात पेरण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात यंदा पाच हजार ४०५ हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत २४३ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. पेरण्याला असणारे पोषक वातावरण असून आता पेरण्याला वेग येईल – शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,

जिल्ह्यात या पिकांचे पेरण्या…
रब्बी हंगामात कोकणातील शेतकरी कुळीथ, पावटा, हरभरा, मूग, संकरित मका, काही ठिकाणी ऊस, वाल कडधान्यांसह पालेभाज्या, मिरची, वांगी, नवलकोल या भाज्यांची लागवड करतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 17/Nov/2025