Guhagar : शृंगारतळीत अवजड वाहनाने सर्व्हिस वायर तोडल्याने संताप

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल एलएनजी मार्गावर सातत्याने ये-जा करणाऱ्या एका अवजड वाहनाने सर्व्हिस वीजवाहिनी तोडली. यानंतर संबंधित चालक वाहनासह तेथून पसार झाला. शृंगारतळी बाजारपेठ येथे गुरुवारी हा प्रकार घडला. यावेळी दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. या अवजड वाहतुकीमुळे शृंगारतळी-चिपळूण मार्गावरील वाहतूक धोकादायक ठरत आहे.

अंजनवेल एलएनजी येथे १६ टायरची मोठी वाहने नेहमी ये-जा करत आहेत. हे गॅसवाहू टँकर एखाद्या वळणावर इतर वाहनांना मोठी अडचण ठरत आहेत. एकापाठोपाठ ही जड वाहतुकीची वाहने सुसाट धावत असतात. पालपेणे फाटा येथे या वाहनांना वळण घेताना मोठी कसरत करावी लागते. शृंगारतळी बाजारपेठेत तर या वाहनांमुळे मोठी वाहतूक कोंडी होते. दुचाकीस्वार, चारचाकी वाहनांना या मोठ्या वाहनांचा त्रास होत आहे.

शृंगारतळी बाजारपेठेतून अनेक सर्व्हिस वीजवाहिन्या रस्त्यावरुन गेलेल्या आहेत. बाजारपेठेतील रसवंती गृहापासून ते पोलिस चौकीपर्यंत अशा वीजवाहिन्या गेलेल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरुन ही मोठी वाहने जाताना वीजवाहिन्यांना लागतात. ही वाहनेही सुसाट असतात. त्यामुळे एखादी वीजवाहिनी यामध्ये सापडून ती तुटते व वीजपुरवठा खंडित होतो. अशाप्रसंगी ही वाहने थांबतही नाहीत. या वाहनचालकांकडून कोणतेही सुरक्षा नियम पाळले जात नाहीत.

त्यामुळे येथील व्यापारी, ग्रामस्थ या आक्रमक झाले असून वाहनचालकांना योग्य ती समज न दिल्यास नागरिकांसह आक्रमक पवित्रा घेतला जाणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवलकर यांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 29/Nov/2025