चिपळुणात लाकूड तस्करांना चाप! असुर्डे हायवेवर वन विभागाची धडक कारवाई; ८० मण खैर साठा जप्त

चिपळुणात लाकूड तस्करांना चाप! असुर्डे हायवेवर वन विभागाची धडक कारवाई; ८० मण खैर साठा जप्त

चिपळूण (वार्ताहर): चिपळूण तालुक्यातील असुर्डे महामार्गावर वन विभागाने रविवारी (दि. ३० नोव्हेंबर) सकाळी मोठी कारवाई करत लाकूड माफियांना दणका दिला आहे. विनापरवाना आणि अवैध रित्या खैराच्या लाकडाची वाहतूक करणारी एक गाडी वन विभागाने पकडली असून, यात सुमारे ८० मण खैर लाकूड आढळून आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सिनेस्टाईल पाठलाग आणि कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास असुर्डे महामार्गावरून एका मोटारीतून संशयास्पदरीत्या लाकूड वाहतूक होत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनपाल रेशमा कावळे आणि वन कर्मचारी श्री. जाधव यांच्या सतर्क पथकाने सापळा रचला. त्यांनी संशयास्पद वाटणारे वाहन थांबवून तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणात खैराचे लाकूड असल्याचे निदर्शनास आले.

८० मण लाकूड जप्त

तन्मय मंगेश सुर्वे (रा. साखरपा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या गाडीमध्ये सुमारे ८० मण खैराचे लाकूड होते. धक्कादायक बाब म्हणजे, हे लाकूड तोडण्यासाठी किंवा त्याची वाहतूक करण्यासाठी लागणारा कोणताही वैध परवाना किंवा पास वाहन चालकाकडे नव्हता. हे लाकूड दहीवली येथील एका कात-भट्टीवर (काथ बनवण्याचा कारखाना) नेले जात होते, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

गाडी वन विभागाच्या ताब्यात

कारवाईनंतर वन विभागाने लाकडाने भरलेली सदर गाडी ताब्यात घेतली असून, ती सध्या असुर्डे येथील पटेल मिलच्या आवारात जमा करण्यात आली आहे. गाडीची चावी वन कर्मचाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड आणि तस्करीच्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 01/Dec/2025