लांजा-राजापुरात विरोधकांचा ‘सुपडा साफ’ होणार; महायुतीला १०० टक्के यशाची खात्री – आ. किरण सामंत

लांजा/राजापूर: रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नगरपंचायत आणि राजापूर नगरपालिकेसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. अत्यंत अटीतटीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीनंतर आता विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. कोकणातील मुरब्बी राजकारणी आणि लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी या निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. “लांज्यात १७ पैकी १७ जागा जिंकून विरोधकांचा सुपडा साफ करू, तर राजापुरात ‘मी म्हणजेच राजापूर’ म्हणणाऱ्यांना जनता चपराक देईल,” असे सडेतोड वक्तव्य किरण सामंत यांनी केले आहे.

लांजा नगरपंचायतीत १०० टक्के निकालाचा दावा

लांजा नगरपंचायत निवडणुकीबाबत बोलताना आमदार किरण सामंत यांनी अतिशय धाडसी दावा केला आहे. त्यांच्या मते, लांजा नगरपंचायतीमध्ये महायुती इतिहास घडवणार आहे. येथील १७ पैकी १७ नगरसेवक महायुतीचेच निवडून येतील. तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार तब्बल ४ हजार पेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

राजापुरात २० पैकी १९ जागा जिंकणार

राजापूर नगरपालिकेतही महायुतीचीच लाट असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. “राजापूरच्या २० जागांपैकी १९ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील. तसेच नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार १२०० ते १५०० मताधिक्याने निवडून येईल,” असे गणित सामंत यांनी मांडले आहे.

हुस्नबानू खलिफे यांच्यावर जोरदार टीका

राजापूर नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे रिंगणात आहेत. त्यांच्यावर निशाणा साधताना किरण सामंत म्हणाले, “हुस्नबानू खलिफे या पूर्वी विधान परिषदेवर होत्या, काँग्रेसने त्यांना मोठी संधी दिली होती. आता त्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. मात्र, ‘मी म्हणजेच राजापूर’ असा जो गैरसमज त्यांनी करून दिला होता, त्याला राजापूरवासीय या मतदानातून जोरदार चपराक देतील.”

विकासकामांच्या जोरावर विजयाचा विश्वास

किरण सामंत हे कोकणातील राजकारणातील एक मुरब्बी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. सर्वांना बरोबर घेण्याची त्यांची हातोटी आणि जनतेच्या मनात निर्माण केलेले स्थान यामुळे ते विरोधकांना चितपट करण्यात पटाईत आहेत. आमदारपदी निवडून आल्यापासून त्यांनी मतदारसंघात विकासकामांचा झपाटा लावला आहे. एक तत्पर आणि कार्यक्षम आमदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. याच कामाच्या जोरावर लांजा आणि राजापूरमध्ये महायुतीला एकहाती यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.