समुदाय केंद्र (थिबा राजा कालीन बुध्दविहार) विकसित करणे कामाचे भूमिपूजनशांतीचा संदेश देशापर्यंत पोहचला पाहिजे – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी नगरपरिषद महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजनेंतर्गत समुदाय केंद्र (थिबा राजा कालीन बुध्दविहार) विकसित करणे या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करुन सोमवारी करण्यात आले. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, प्रांताधिकारी जीवन देसाई, गटविकास अधिकारी जे पी जाधव, मुख्याधिकारी तुषार बाबर, उत्पादन शुल्क उपायुक्त विजय चिंचाळकर, उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे, थिबा राजाकालीन बुध्द विहार स्थळ विकास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष मारुती कांबळे, भगवान जाधव, सचिव विजय मोहिते आदी उपस्थित होते.सुरुवातीला भन्ते शांतीबुध्द यानी पंचशील दिले. यावेळी बुध्द वंदना, पुष्प पुजा आणि त्रिरत्न वंदना झाली. भगवान बुध्दांच्या प्रातिमेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास, थिबा राजा यांच्या आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, बुध्दविहार व्हावे, ही ५० वर्षांपासूनची मागणी आज पूर्ण होत आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही जागा २४ तासात बुध्दविहारला देण्याचा निर्णय घेण्यात आला. केवळ जागा मिळाली असे नाही, त्यासाठी ७ कोटी ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला. त्याचे टेंडरसुध्दा झाले आणि प्रत्यक्षात आज भूमिपूजन करताना, मला आज मनापासून आनंद होत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिले, त्याच संविधानावर मी मंत्री झालो. त्याला स्मरुन सांगतो, ही जागा तुमची आहे, तुमच्याकडेच राहील. वर्षभरात ही इमारत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल. तुम्हाला मी दिलेला शब्द पूर्ण करु शकलो, याचा मला सार्थ अभिमान आहे. देशातले एक सुंदर बुध्दविहार पूर्ण केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही.
पाली येथील बुध्दविहारसाठी देखील ३ गुंठे जागा दिली आहे, असे सांगून, पालकमंत्री म्हणाले, मतदानाचा अधिकार देणाऱ्या डॉ. बाबासाहेबांचे आम्ही ऋणी आहोत. त्यांच्याविषयी आम्हा सगळ्यांना आदर आहे. लंडनमधील बाबासाहेबांच्या स्मारकाला भेट दिली. जगण्याचा अधिकार ज्यांनी दिला, त्या बाबासाहेबांचे स्मारक आमच्या सरकारने बनविले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी भन्तेजींना बोलावून त्यांचा आदर सन्मान केला. प्रत्येक धर्माचा आदर करणारे मुख्यमंत्री राज्याला लाभले आहेत. राज्याची, देशाची उन्नती आता मागे राहिलेली नाही. जगाला युध्दाची नाही तर बुध्दाची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, असेही पालकमंत्री म्हणाले.
मला खुर्चीची नाही तर, तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा
भन्तेजीजी शांतीबुध्द यांनी पंचशील देताना आणि बुध्द वंदना करताना पालकमंत्री श्री. सामंत हे हात जोडून, मांडी घालून, सर्वांच्या सोबत बसून होते. ट्रस्टचे अध्यक्ष श्री. पवार यांनी त्यांना खुर्चीवर बसण्याची विनंती केली. हा प्रसंग सांगतानाच ते म्हणाले, मला खुर्चीची अपेक्षा नाही, तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा आहे. जी खुर्ची मिळाली आहे, ती तुमच्या आशीर्वादानेच मिळाली आहे. या बुध्द विहाराचे श्रेय तुमच्या सर्वांचे आहे. त्यासाठी तुम्ही पाठपुरावा केला आहात. या बुध्दविहारातून शांतीचा संदेश देशापर्यंत पोहचला पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालय इमारतीचे भूमिपूजन
पालकमंत्री श्री. सामंत यांनी कुदळ मारुन आणि कोनशिला अनावरण करुन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालय इमारतीचे भूमिपूजन केले. मुख्य कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री म्हणाले, उत्पादन शुल्कचे अधिकारी वर्षभरानंतर या वातानुकुलित इमारतीत जातील. जिल्ह्यातील आमची जनता ‘एसी’त राहणारी नाही, याचे भान कामकाज करताना अधिकाऱ्यांनी ठेवावे, असे ते म्हणाले.
ट्रस्टचे अध्यक्ष श्री. पवार यांनी स्वागत प्रस्ताविक करुन बुध्दविहारविषयी माहिती दिली. कार्यक्रमास नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.